This is a speech I wrote to be read at the memorial of my uncle Vijaykumar Naik, a theatre maker and mentor, who passed away on 18th January 2024.
कामानिमित्त सद्या पोर्तुगालला असल्याकारणाने मी माझ्या कुटुंबाच्या आणि हंस परिवाराच्या ह्या दुःखाच्या क्षणात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नाही पण इथे सात समुद्रापलीकडे सुद्धा खूप एकाकी वाटतंय. गेल्या काही वर्षात हंस परिवाराने अनेक धक्के सहन केले. २०१७ साली माझे वडिल, सोमनाथ नाईक, ह्यांचं निधन झालं, त्यानंतर २०१९ मध्ये विष्णू मामा आणि आता विजू बाबा! आयुष्याला कलाटणी देणारी हि माणसं एकाएकी निघून गेल्यावर आता एक अनंत पोरकेपण आपल्या नशिबात आल्याची ठाम जाणीव बाळगून मीच नाही तर आम्ही सगळेच उभे आहोत. मी काही जास्त बोलू इच्छित नाही. फक्त काही आठवणी, ज्या माझ्या डोळ्यासमोर तरळल्या, त्याच इथे तुमच्यासोबत शेयर करणार आहे.
विश्वनाथ नाईकांच्या घरात वाढणं म्हणजे लिविंग रूम कुठे संपतो आणि तालमीची जागा कुठे सुरु होते ह्याचे काही ठोस निकष नव्हते. १९९३ साली जेव्हा विजू बाबांनी हंस थिएटर ट्रेनिंग सेंटरची स्थापना केली तेव्हा मी दोन वर्षांचा होतो. तेव्हा घरी हि सगळी मंडळी यायची आणि आमच्यासोबत खूप खेळायची, आम्हाला घेऊन फिरायची. अजय काका जेव्हा गाण्यांना चाली लावायचा तेव्हा मी तो वाजविणाऱ्या पेटीकडे एकटक बघत राहायचो. विजू बाबांच्या एक अधुरी कहाणी ह्या नाटकातली गाणी अजून आठवतात.
त्याकाळी फ्लेक्स प्रिंटिंग एवढे प्रसिद्ध नव्हते त्यामुळे प्रत्येक शिबिराचे, नाटकाचे पोस्टर्स बाबा स्वतः हातांनी बनवायचा. मी आणि माझी बहीण तो पोस्टर बनवून सुकेपर्यंत बाबाच्या बाजूलाच बसायचो. कारण पोस्टर बनवून संपल्यानंतर त्याच्या संग्रहातील पोस्टर कलर्स आम्हाला वापरायची मुभा होती. तसंच आता जसं व्हॉट्सऍपचं प्रस्थ आहे, तेव्हा काही नव्हतं. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाचं निमंत्रण हे पोस्टकार्डावर स्वतः लिहून तो लोकांना पाठवायचा. कालांतराने आम्हीही त्याच्यासोबत पोस्टकार्डस लिहू लागलो. शाळेच्या सुट्टीत आमची रवानगी शास्त्री हॉलमधल्या नाट्यशिबिरात व्हायची. मधल्या सुट्टीत बाबा आमच्यासाठी सामोसे घेऊन यायचा. हळूहळू शिबिरार्थी म्हणून येणारे आम्ही शिबिरं घेण्यात बाबाला मदत करायला लागलो. मी, रोहन, वृषांक काणेकर हे आमचं समवयस्क त्रिकुट. आम्ही ह्याच शिबिरांतून घडलो. मोठ्या नाटकांत काम करू लागलो. बाबांबरोबर नाटक करता करता अक्खा गोवा पिंजून काढला.
खूप जुनी गोष्ट आहे. तेव्हा कदाचित मी पाचवी-सहावीत असेन. शाळा दुपारी असल्याने सकाळी लवकर उठायची गरज नसायची पण त्या दिवशी कोण जाणे मी का उठलो होतो. आई चहा बनवत होती आणि विजू बाबा सकाळी लवकर उठून काणकोणला जाणार होता. त्याकाळी तो काणकोणमधल्या शाळांत नाटक शिकवीत असे. म्हणजे आत्ता जे थिएटर आर्ट टीचर्स गोव्यातल्या शाळांत आहेत त्या योजनेचा हा पायलट प्रोजेक्ट होता. त्यात बहुतेक प्रमोद महाडेश्वर सरही होते. मी किचनमध्ये शिरत होतो इतक्यात माझ्या कानावर पडलं कि विजूबाबा आईकडे पैसे मागत होता काणकोणला जायला. काणकोणला जाणे म्हणजे तेव्हा दोन अडीच तास बसप्रवास करून जावे लागे. त्यावेळी त्याला पगारही काही खास नव्हता. पण त्याची कधीच फिकीर त्याने केली नाही. त्याला नाटक करायचं होतं आणि तो नाटक करत राहिला, शिकवत राहिला. काही वर्षांनी जेव्हा आम्ही धमाल गोवा हे नाटक घेऊन राजस्थानला जाणार होतो तेव्हा त्याने स्वतःची अंगठी गहाण ठेऊन पैसे काढले होते. स्वतःच्या हौसेपायी पदरचे पैसे मोडून नाटक करणे गोव्यात नवीन नाही पण तरुण मुलांना नाटक शिकवायला, त्यांना गोव्याबाहेरील नाट्यचळवळीचं भान यावं म्हणून झटणारा बाबा विरळाच.
डिसेंबरच्या सुट्टीत बाबा लोकविश्वास प्रतिष्ठानमध्ये निवासी नाट्यकार्यशाळा घ्यायचा. तेव्हा माझी आई दहा दिवस तिथे राहून सहभागी मुलांसाठी जेवण बनवत असे. तिच्या मदतीला एकनाथ नाईक असायचा. बहुतेक राजदीप नाईक पण असायचा. आई उरल्या वेळेत विद्यार्थ्यांचे पेपर तपासायची. पुढे ती धुरा ज्योती काकींनी सांभाळली. पण आम्हाला हे कधीच ऑड वाटलं नाही. शिबिराला जाऊन तिथे मदत करणं हे घरचंच काम आहे असं आम्हाला वाटायचं. दर नाट्यकार्यशाळेमागे २०-२५ नवीन मुलं हंस परिवाराचा भाग बनायची.
बाबाचा सर्वात महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे रंगयात्रा. कमीत कमी खर्चात गोव्यातल्या विविध कॉलेजेसमध्ये जाऊन तिथल्या मुलांसाठी नाट्यविषयक, साहित्यविषयक उपक्रम राबवले जायचे. आज जश्या आम्हा सर्वांकडे गाड्या स्कुटर्स आहेत तेव्हा तसं काहीच नव्हतं. मी आणि नितेश त्याच्या छोट्याश्या सनीवर बसून तिथे मुलांना चहा पॅटिस घेऊन जायचो. आज जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा रंगयात्रेच्या मांडवाखालून गेलेले कित्येक लोक गोव्याच्या रंगभूमीवर कार्यरत आहे. अगदी पेडणे ते काणकोण आणि सत्तरी ते वास्को पर्यंत. हे कार्य बाबा नित्यनेमाने आणि निस्वार्थीपणाने करत राहिला. त्याने कित्येक नाटकं लिहिली, सादर केली ह्यापेक्षा त्याने घडवलेली कलाकारांची फळी आजही गोव्यात विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. ते त्याचं खरं संचित आहे. दुर्गम भागातून, घराची परिस्थिती बेताची असलेली, आयुष्यात कधीही रंगमंचावर न चढलेली किंवा नाटक न पाहिलेली, अशी मुलं त्याने निवडून, त्यांच्यासोबत नाटक बसवून त्यांना गोव्यातच नाही तर महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल सारख्या भागांत नेऊन त्या नाटकांचे प्रयोग सादर केले. एक राष्ट्रीय नाट्यप्रवाहाचं भान ह्या मुलांना दिलं. ह्या गोष्टी पुण्यामुंबईत करणं खरंतर सोपं आहे कारण तिथे नाटक करण्याला एक इमिजिएट ग्लॅमर आहे, त्याला सपोर्ट करणारी एक व्यवस्था आहे. पण हे सगळं गोव्यात राहून करणं, शहरी नाही तर गोव्यातल्या दुर्गम भागातील मुलांसोबत करणं हे अतुलनीय आहे. आणि त्याहूनही अधिक ते नित्यनेमाने करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. हंस संगीत नाट्य मंडळात नवनवीन कलाकारांची फळी येत गेली ह्याचं मोठं कारण विजू बाबा आहे.
सांगताना उर भरून येतोय कि येत्या एप्रिलमध्ये हंस परिवार आपल्या वयाच्या ७५व्या वर्षात पदार्पण करेल. २०२५ साली हंसला ७५ वर्षे पूर्ण होतील. गेल्या इतक्या वर्षात रंगभूमी बदलली आणि आम्हीही बदललो. संस्थेने नवनवीन धाटणीची नाटकं लोकांसमोर सादर केली आणि आज तिसऱ्या पिढीपर्यंत हा प्रवास येऊन पोचलेला आहे. हंसच्या तिसऱ्या पिढीचा पाया हा विजू बाबांनी घालून दिलेल्या बुनियादीवर भक्कम उभा आहे. २००० साली जेव्हा संस्थेला ५० वर्षे झाली तेव्हा ७५ दूर भासत होतं. तेव्हाच्या पिढीने आजोबांना वाचन दिलं होतं कि एवढी वर्षे हुकलेलं अंतिम स्पर्धेतील पहिलं बक्षीस संस्थेला मिळवून देऊ. संस्थेचा नावलौकिक राष्ट्रीय पातळीवर नेऊ. २०१८ साली सादर केलेल्या अव्याहत ह्या नाटकातून ह्यातल्या बऱ्याच गोष्टी सिद्ध झाल्या. एवढी वर्ष एकमेकांचा हात धरून हा प्रवास सगळ्यांनी केला. त्यातला एक हात सुटला तरी मनात धाकधूक होते. हंस हि एक नाट्यसंस्था आहे त्याहीपेक्षा तो एक परिवार आहे आणि परिवार असण्याचे शाप आणि वरदान ह्यांच्या कक्षेबाहेर आम्हीही नाही. नाटक सुरु होण्यापूर्वी आणि नाटक संपल्यानंतर हा परिवार अविरत वावरत असतो.
काही वर्षांपूर्वी इब्राहिम अल्काझींची नात असलेल्या झुलेखा चौधरींनी मला फॅमिली थिएटर्सवर एक लेख लिहायला सांगितला होता. तो मी अजून लिहू शकलेलो नाही. कारण आमच्यासाठी हे समीकरण एवढं एकमेकांत गुंतलेलं आहे कि ते वेगळं काढून त्याची चिकित्सा करता येणं अवघड आहे. मी कदाचित हंसने सादर केलेल्या नाटकांची यादी देऊन त्यावर एक अभ्यासात्मक लेख लिहू शकतो पण कला अकादमीचा ७ वाजताचा प्रयोग असताना, पावणेसातला जेव्हा मंदार जोग हातात पंचारती घेऊन आरतीस स्वर लावतो तेव्हा संस्थेतल्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू का येतात ह्याचं विश्लेषण मी करू शकणार नाही. बाबा म्हणायचा थेटरच्या वास्तूत संस्थेच्या कलाकारांचे आत्मे वास करतात आणि प्रयोगाच्या आधी खाली येऊन ते आम्हाला आशीर्वाद देतात. विजू बाबा आता थेटरात वास करणाऱ्या आत्म्यामध्ये जाऊन बसलाय. आता प्रयोगाच्या आधी त्याच्या पाया पडताना डबडबलेल्या डोळ्याने आमच्या डोक्यावर तो कदाचित हात ठेवणार नाही, पण प्रयोगापूर्वीच्या सायलेन्समध्ये त्याचा हुंदका नक्की ऐकू येईल.