२०१३ साली तत्कालीन मुख्यमंत्री स्व मनोहर पर्रीकर ह्यांनी एका मुलाखतीत ‘गोव्यातील कॅथॉलिक समाज हा सांस्कृतिकरीत्या हिंदू आहे’ अश्या स्वरूपाचे काहीसे वादग्रस्त विधान केले होते. आजही अशाप्रकारची विधाने, खासकरून निवडणुकीच्या तोंडावर आपण ऐकत असतो. गोव्यातल्या मुस्लिम समाज इतर मुस्लिम समाजापेक्षा वेगळे आहे असेही म्हटले जाते. मुळात सत्ताधिष्ठीत समाजातील एका नेत्याने अल्पसंख्यांक समाजाविषयी असे विधान करणे बरोबर नाही. पर्रीकरांना गोव्यातले कॅथॉलिक सांस्कृतिकरीत्या हिंदू वाटतात ह्यापेक्षा गोव्यातल्या कॅथॉलिक समाजाला तसे वाटते का हे महत्वाचे आहे. ते मांडण्याची मुभा आणि साधने प्रत्येक अल्पसंख्यांक समाजाकडे असतीलच असे नाही. आणि तसेही गोव्यातील कॅथॉलिक समाज हा काही एकगठ्ठा समाज नाही. त्यातही वर्गवार आणि जातवार विभागणी आहे त्यामुळे त्यातली विविधता नाकारून सरसकट सगळ्या कॅथॉलिक समूहाला एकाच माळेत तोलणे हेही बरोबर नाही.
अशी विधाने वरवर ठीक वाटत असली तरी ती काही मूलभूत प्रश्न निर्माण करतात. मुळात हिंदू असणे म्हणजे काय, ख्रिश्चन (त्यातही कॅथॉलिक) असणे म्हणजे काय ह्याची व्याख्या कोणती? त्या व्याख्येची ऐतिहासिक प्रक्रिया काय? गोव्यात हिंदू किंवा कॅथॉलिक असण्याची ठळक वैशिष्ट्ये कोणती? ह्यातल्या सीमारेषा अगदीच स्पष्ट आहेत का पुसट आहेत? गोव्यातले कॅथॉलिक जसे सांस्कृतीकरित्या हिंदू भासतात तसेच गोव्यातल्या हिंदूंना सांस्कृतीकरित्या कॅथॉलिक म्हणू शकतो का? अश्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न डॉ. अलेक्झांडर हेन ह्यांनी आपल्या ‘हिंदू कॅथॉलिक एन्काऊंटर’ ह्या पुस्तकात केला आहे. जर्मनीतील हायडेलबर्ग विद्यापीठात रिलिजियस स्टडीज मध्ये डॉक्ट्रेट मिळवून ते सद्या अमेरिकेतील ऍरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये भारतीय धर्माचे अध्यापन करतात.
समाजात कुठलाही समज आपसूकच अस्तित्वात नसतो तर तो समज रूढ होण्याची एक निरंतर प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेचे मापन समाजशास्त्रात विविध पद्धतीने केले जाते. इतिहास आणि मानवशास्त्र (अँथ्रोपॉलॉजी) ह्या त्या प्रक्रियेचे मापन करण्याच्या दोन प्रमुख ज्ञानशाखा आहेत. डॉ हेन ह्यांचे पुस्तक ह्या दोन्ही ज्ञानशाखांचा आधार घेऊन गोव्यातील समाजात धार्मिकतेची व्याख्या आणि जागा, त्याच्या जडणघडणीची प्रक्रिया ह्याविषयी धांडोळा घेतात. पोर्तुगीज शासनामुळे एक नवीन धार्मिक जाणीव आणि आधुनिकतेशी सामना करत असलेल्या सोळाव्या शतकातील गोमंतकीय समाजात आलेली स्थित्यंतरं आणि त्याचे आजही आढळून येणारे प्रभाव ह्यांची साखळी हेन बांधतात. गोमंतकीय समाजात हिंदू आणि कॅथॉलिक संस्कृतींची सरमिसळ होऊन एक संकीर्ण (सिंक्रेटीक) धार्मिक जाणीव उदयास आली असल्याचे मत हेन आपल्या संशोधनातून मांडतात.
पहिल्या प्रकरणात ते पूर्वेकडील ख्रिस्ती अनुयायांच्या शोधात निघालेल्या पोर्तुगीज प्रवाश्यांविषयी लिहितात. वास्को द गामासाठी पूर्वेकडे जाणे हा नवीन विश्वाचा, ज्ञानाचा किंवा अनुभवाचा शोध घेणे नसून आधीच असलेले ज्ञान आणि अनुभव दृढ करण्याचा प्रकल्प होता असे ते म्हणतात. त्यामुळे ‘डिस्कव्हरी’ ह्या संज्ञेला एक वेगळा आयाम प्राप्त होतो. दुसऱ्या प्रकरणात पोर्तुगीज राजवटीने आरंभलेल्या मूर्तिपूजेविरुद्धच्या मोहिमेबद्दल ते लिहितात. ह्या मोहिमेंतर्गत देवळे, घुमट्या इत्यादी तोडून तिथे ख्रिस्ती धार्मिकस्थळे बांधण्यात आली ह्या प्रक्रियेचा सारांश ते देतात. तिसऱ्या प्रकरणात जेजुइट मिशनरींद्वारा स्थानिक संस्कृतीशी संवादी राहून ख्रिस्ती धर्माची एक दक्षिण आशियाई व्याख्या निर्माण झाली ह्याविषयी हेन सविस्तर लिहितात. स्थानिक संस्कृती, समाजव्यवस्था सामावून घेऊन ख्रिस्ती धर्मानुभव निर्माण करणे हि जेजुइट पंथाची खासियत होती. जेजुइट इतिहासात ह्या प्रक्रियेला ‘ऍकोमोडाशियो’ असेही म्हटले जाते. फादर थॉमस स्टीफन ह्यांनी वैष्णव पंथातील प्रतीकांचा वापर करून ‘ख्रिस्तपुराण’ हा बायबलच्या मराठी अविष्कार ह्याच प्रक्रियेत मोडतो. जेजुइटपंथीयांनी`निर्माण केलेली मराठी व्याकरणे, शब्दावली इत्यादी विषयी हेन ह्या प्रकरणात लिहितात.
गोव्यातल्या ख्रिस्ती धर्माच्या प्रसारप्रक्रिया उद्घृत केल्यावर हेन सरळ विसाव्या शतकात येतात. नव्वदीच्या दशकापासून हेन गोव्यात फिल्डवर्क करत आहेत आणि ह्यापुढील प्रकरणे ह्याच फिल्डवर्कवर आधारित आहेत. चौथ्या प्रकरणापासून गोव्यातले हिंदू आणि कॅथॉलिक समाज एकत्ररित्या कसे राहतात ह्याविषयी ते सविस्तर मांडणी करतात. त्यासाठीचा मूलभूत आधार गोमंतकीय गाव आहे. हेन ह्यांच्या मते गावाची संकल्पना हि केवळ आर्थिक आणि सामाजिक निकषांवर नाही तर धार्मिक निकषांवरही (उदा. ग्रामदेवता, जत्रा किंवा फेस्त ह्यासारखे ग्रामदेवतांचे उत्सव, व त्याला जोडून असलेले मानसन्मान इ.) आधारलेली आहे.
हेन ह्यांच्या मते गावातल्या धार्मिक तसेच दैनंदिन जीवनात आढळून येणारा हिंदू कॅथॉलिक समन्वय ढोबळमानाने तीन प्रकारात मोडतो. पहिला प्रकार म्हणजे गावच्या सीमा व ग्रामदेवतांच्या अधिष्ठानाखाली येणारा गावाचा परीघ. ह्यात विविध ग्रामदेवतांचे असलेले स्थानिक महत्व उदा. खुरीस आणि घुमटयांकडे असलेली गावपणाची आणि रक्षणाची जबाबदारी ह्यासारख्या रूढीपरंपरा मोडतात. दुसरा प्रकार म्हणजे ग्रामदेवतांमधील एकमेकांत असलेल्या नात्यातून हा समन्वय अधोरेखित होतो असे हेन मांडतात. उदा. लईराई, महामाई, मोरजाई, केळबाय, आदिपाय ह्या पाच बहिणींची सहावी बहीण मीराबाई म्हणजे फिरंग्यांनी धर्मांतरित केलेली मिलाग्रीस, आणि सातवी बहीण सीता जी पाताळात गडप झाली. ह्या सर्व बहिणी गोव्यातल्या नव्या आणि जुन्या काबिजादींमधील गावांमध्ये पुजल्या जातात. तिसरा प्रकार म्हणजे ग्रामस्थ आणि पांथस्थांच्या आरोग्य आणि खुशालीमध्ये ग्रामदेवतांचे असलेले महत्व. उदा. बांबोळी येथे असलेला फुलांचा खुरीस किंवा म्हापश्यातील बोडगेश्वर हे तिथल्या गावच्या लोकांचे तसेच तिथून प्रवास करणाऱ्याच्या आरोग्यावर अंकुश ठेवतात आणि ह्या भावनेत धर्माचे बंधन ना देवाला ना भक्ताला आड येते. ह्यातूनच एक प्रगल्भ आणि संकीर्ण धार्मिक जाणीव गोव्यातील समाजमनात रूढ झाली आहे असे मत हेन मांडतात. हाच मुद्दा अधिक ठळकपणे समजविण्यासाठी पाचव्या प्रकरणात हेन शिवोली गावातील जागर उत्सवाचे उदाहरण घेऊन हिंदू-ख्रिस्ती धार्मिक संवादाची वैशिष्ट्ये स्पष्ट करतात.
सरतेशेवटी गोव्यातील हिंदू ख्रिस्ती समन्वयाद्वारे धार्मिक संकिर्णतेच्या संकल्पनेवर एकूणच पुनर्विचार करणे गरजेचे आहे असे हेन म्हणतात. धर्माच्या अध्यापनात किंवा एकूणच मानव्यशास्त्रांमध्ये संकिर्णतेला काहीश्या संशयास्पदरित्या पाहिले जाते आणि ह्याला ठोस कारणे आहेत. हेन ह्यांच्याच पुस्तकाचे उदाहरण घ्यायचे झाले तर जे कॅथॉलिक नाही ते हिंदू असा समाज दृढ मानून हेन आपली मांडणी करतात. पण सोळाव्या शतकात आपण हिंदू आहोत हि जाणीव बिगर कॅथॉलिक समाजात होती का? आणि असलीच तर ती समान पातळीवर होती का ह्याविषयी प्रश्न निर्माण केले जाऊ शकतात. बेताळ, जाग्यावयलो, भूतनाथ किंवा सांतेरी इ. ह्या ग्रामदेवता प्रामुख्याने ब्राह्मणेतर समूहांमध्ये लोकप्रिय आहेत पण हेन ह्यांच्या विवेचनात जातिव्यवस्थेचा समावेश फारसा नसल्याने त्यांच्या संकिर्णतेची व्याख्या हि सरसकट संपूर्ण गोमंतकीय समाजाला लागू होते कि नाही ह्याबद्दल प्रश्न आहे. ह्या तार्किक मर्यादा असल्या तरीही गोव्यातील धार्मिक जाणिवांची जडणघडण समजायची असेल तर हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल.
– कौस्तुभ सोमनाथ नाईक