कोकणीच्या प्राचीनत्वाचा अट्टाहास टाळा

मुंबई मिरर ह्या वर्तमानपत्रात २१ सप्टेंबर २०२५ रोजी विवेक मिनेझिस ह्यांचा ‘कोकणी सिटी’ नावाचा एक लेख प्रकाशित झाला. लेखाचा थोडक्यात मुद्दा असा आहे कि दामोदर मावजोचे कोकणी लेखन हे मुंबईच्या इतिहासाशी जोडलेले आहे कारण मुंबईतही कोकणी लिहिली व बोलली जात होती. ह्या लेखात मिनेझीस ह्यांनी इसवी सन ११८६ सालातील शिलाहारांच्या एका शिलालेखाचा उल्लेख देऊन सांगतात कि कुर्ला इथे सापडलेल्या ह्या शिलालेखात शेवटच्या तीन ओळी ह्या कोकणात लिहिल्या आहेत. ह्या विधानाचा संदर्भ विचारल्यानंतर मिनेझिस ह्यांनी तेनसिंग रॉड्रिगीज ह्यांचा ओ हेराल्द मध्ये ९ जून २०२४ रोजी प्रकाशित झालेला इंग्रजी लेख पाठवला. त्या लेखात तेनसिंग रॉड्रिगीज लिहितात कि कुर्लानजीकच्या महावली ह्या गावात सापडलेल्या ह्या शिलालेखात २५ ओळींपैकी २२ ओळी संस्कृतमध्ये व शेवटच्या तीन ओळी ह्या कोकणीमध्ये लिहिलेल्या आहेत. त्या लेखात दिलेला संदर्भ घेऊन मी मूळ शिलालेख शोधून काढला. त्यातील संबंधित ओळी खालीलप्रमाणे आहेत.

जो कोणु हुविए शासन लोपी तेया श्रीवैद्यनाथ देवाची भाल सकुटुंबिआ पडे
तेव्हाची माय गर्दभ झविजे

ह्याचा अर्थ- जो कोणी होऊन (म्हणजे मुद्दामहून) शासन तोडेल त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर देवाचा त्रिशूळ (फाळ) पडेल. त्याच्या मातेबरोबर गाढव संभोग करेल. हि लोकभाषेत सूचना नियम मोडणाऱ्यासाठी लिहिली जात असे व बऱ्याच शिलाहारकालीन शिलालेखात ती आपल्याला पाहायला मिळते. ह्या शिलालेखांना गधेगळ म्हणतात.

आता हि वाक्ये कोंकणीत लिहिली आहे हा साक्षात्कार तेनसिंग रॉड्रिगीज ह्यांना कसा झाला ते कळण्यास मार्ग नाही. त्यांनी दिलेल्या संदर्भात तरी तसा स्पष्ट बोध होत नाही. मिराशी ह्यांच्या कॉर्पस इन्स्क्रिप्शनम इण्डिकारम (खंड सहावा) ह्यात स्पष्टपणे लिहिलेले आहे कि ह्या ओळी मराठी आहेत (पान नं १६१). तसेच शं. गो. तुळपुळे ह्यांनी आपल्या ‘प्राचीन मराठी कोरीव लेख’ ह्या ग्रंथात कुठेही ह्या ओळी कोंकणीत आहेत असे म्हटलेले नाही. वरून त्यांनी ‘भाल’ ह्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करत तो कसा मराठी आहे ह्यावर एक मोठी तळटीप लिहिलेली आहे. तसेच एपिग्राफिया इंडिकाच्या २३ व्या खंडातही ह्या ओळी जुन्या मराठीत आहे असे लिहिलेले आहे (पान नं २७०). ह्यापैकी मिराशी आणि एपिग्राफिया इंडिकेचे संदर्भ खुद्द तेनसिंग रॉड्रिगीज ह्यांनी आपल्या लेखात दिले असले तरी त्यांनी स्वतः ते वाचले आहेत का नाही हे ठामपणे सांगता येणार नाही. ते वाचले असते तर छातीठोकपणे ह्या तीन ओळी कोंकणीत आहेत हि थाप त्यांनी मारली नसती. किंवा त्यांनी ह्या गधेगळीचे विशेष वाचन करून त्या ओळी कोंकणीत आहेत अश्या निष्कर्षापर्यंत ते स्वतः पोचले असतील तर त्या निष्कर्षाचे विवेचनही त्या लेखात नाही.

अश्या अप्रामाणिक लेखनामुळे इतिहासाचे विद्रुपीकरण व नसते गोंधळ निर्माण होतात. गतकाळातही बऱ्याचदा मराठीचे शिलालेख वा इतर गद्य हे आद्य कोकणी म्हणून बऱ्याच लोकांनी खपविले आहे पण बऱ्याच संशोधकांनी हि इतिहासाची थट्टा सप्रमाण खोडूनही काढली आहे. भाषेच्या इतिहासात लेखन वाचनाची एक अव्याहत संस्कृती स्थापित करावी लागते. कोकणीवाले बऱ्याचदा आपल्या भाषेचा इतिहास सांगताना दुसऱ्या सहस्रकाच्या कालपटलावर इथे-तिथे पसरलेली, विखुरलेली आणि क्वचितच आढळणारी उदाहरणे देत राहतात. पण त्या उदाहरणांतून कोणताही सातत्याचा धागा जोडता येत नाही. कोकणीमध्ये असे सातत्य निश्चितच आहे, पण या समृद्ध संस्कृतीचा उगमबिंदू गोव्याच्या चर्चमध्ये आहे आणि तिची लिपी ही रोमी आहे. मग ही वस्तुस्थिती मान्य करण्यात त्यांना संकोच का वाटतो? परवाच कोणीतरी कोकणी भाषेची चळवळ हि पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष असल्याचे विधान केले (याउलट मराठी हि हिंदुत्ववाद्यांच्या आहारी गेलेली आहे असेही लिहिले गेले). तसे जर खरेच आहे तर मग कोकणीचा चर्चप्रणीत इतिहास आणि रोमी लिपीचा स्वीकार करण्यात चळवळीतील पुरोगामी म्हालगड्यांना नेमकी काय अडचण आहे?

तात्पर्य हेच कि कोकणीवाद्यांनी त्यांच्या भाषेच्या शास्त्रशुद्ध इतिहासाचा शोध घेणे हि काळाची गरज आहे. पण ते करताना आपण मराठीपेक्षा किती जुने आहोत हे शाबीत करण्याचा अट्टाहास मात्र त्यांनी टाळावा.

kaustubh
Reads old newspapers and researches on Goan History.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *