भाई मावजो तुम्हारा चुक्याच!

कोकणी मराठी वाद सालाबादप्रमाणे एक दोन वेळातरी उफाळून येतोच. कोकणीवाले मराठीचे गोव्यातले अस्तित्व एक तर मान्य करत नाहीत किंवा सरसकट मराठी गोव्यात कधीच अस्तित्वात नव्हती असले अनैतिहासिक विधान करून मोकळे होतात. ह्यावर प्रतिक्रिया म्हणून मराठीवाले फादर थॉमस स्टीफन्स ह्यांच्या ख्रिस्तपुराणाचे व फादर क्रुवांच्या पीटर पुराणाचे दाखले देतात. व्हॉलीबॉलसारखा असल्या ऐतिहासिक पुराव्यांचा चेंडू एका बाजूहून दुसऱ्या बाजूस परतवला जातो. ह्यावेळी निमित्त झाले आहे दामोदर उर्फ भाई मावजो ह्यांनी गोवा राजभाषा कायद्यात मराठीविषयी केलेल्या वक्तव्याचे. ह्यावर काही प्रतिक्रिया लिहावी म्हणून बसलो तर एक दोन पानांच्या वर काही लिहून झाले नाही. अगदी तीन चार वेळा प्रयत्न करून सुद्धा! मग विचार केला कि असल्या चेंडू परतवण्याच्या सामन्यात भाग घेऊन काही हशील नाही. अवांतर म्हणून काही वाचण्यास घेतले तर २०२२ साली युगवाणी ह्या मराठी नियतकालिकाने काढलेला गोवा विशेषांक हाती लागला. त्यात भाई मावज्यांनी अखिल मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात केलेले भाषण छापून आले होते. त्या भाषणात एक माहिती त्यांनी दिली कि १६८४ साली पोर्तुगीज व्हाईसरॉयने एक फर्मान काढून कोंकणीवर बंदी आणली व ती बंदी तब्बल सव्वादोनशे वर्षे म्हणजे १९१० पर्यंत कायम होती. वाचून एक क्षण थांबलो. वास्तविकतः सोळाव्या-सतराव्या शतकातला इतिहास हा काही माझा संशोधन प्रांत नाही. पण माझ्या पीएचडीच्या निमित्ताने त्या काळाचा इतिहास काहीसा वाचलाय. सव्वा दोनशे वर्षे कोकणावर बंदी म्हणजे जरा अतिशयोक्तीच वाटली. भाईंचे भाषण काही अकादमिक निबंध नाही त्यामुळे तिथे संदर्भ दिले नव्हते. नेमके कुठले फर्मान ते कळत नव्हते. इतर काही इतिहासकार मित्रांना विचारले तर त्यांच्याही लक्षात काही येईना. इंटरनेट वर शोधून पाहिले तर बऱ्याच लोकाभिमुख लेखांत १६८४ ह्या वर्षाचा व त्या फर्मानाचा उल्लेख आढळतो पण नेमके कोणते फर्मान ते कोणीच देत नव्हते. शेवटी क्योको मात्सुकावा ह्या जपानस्थित संशोधिकेने गोव्याच्या भाषिक अस्मितेवर जो निबंध लिहिलाय त्यात संदर्भ सापडला. ह्या फर्मानाचा मूळ स्रोत ज्योकीं कुंया रिव्हारा ह्यांनी Ensaio Histórico da Língua Concani ह्या कोकणीच्या इतिहासावर पोर्तुगीज भाषेतून १८५७ साली लिहिलेल्या निबंधात होता. (ह्या निबंधाचा इंग्रजी अनुवाद थिओफिलस लोबो ह्यांनी केला आहे जो अ.का. प्रियोळकर ह्यांनी प्रकाशित केलेल्या भारतातील छापखान्याच्या इतिहासावरच्या पुस्तकात एका परिशिष्टांतर्गत छापला आहे. सदर पुस्तक पीडीएफ स्वरुपात इंटरनेटवर उपलब्ध आहे.)

रिव्हारा त्यात नेमके काय म्हणतात ते तपासताना काही गोष्टी समजल्या. १६८४ साली कोंकणीवर बंदी घालण्यात आली पण हि अपूर्ण माहिती आहे. सदर निबंधात १६८४च्या आधी निघालेल्या अनेक फर्मानांचा तपशील रिव्हारा देतात ज्यात गोव्यात धर्मप्रसाराचे काम करणाऱ्या मिशनऱ्यांनी स्थानिक भाषा शिकणे व त्यात लोकांशी वार्तालाप करणे हे किती गरजेचे आहे हे स्पष्ट केले आहे. रोमन कॅथॉलिक चर्च, पोर्तुगीज दरबार, गोव्यात सरकार चालविणारे इश्तादो द इंडियाचे अधिकारी, आणि गोव्यात धर्मप्रसारासाठी आलेले विविध ऑर्डर्सचे मिशनरी असे बरेच घटक ह्या व्यवहारात सहभागी आहेत. त्यामुळे हे एकतर एका कार्यालयातून फर्मान काढून ते सव्वादोनशे वर्षे सातत्याने राबवले असे काही नाही तर सतत होणार पत्रव्यवहार, भाषेच्या आणि प्रशासनाच्या अडचणी वगैरेंबाबतीत उहापोह होत असताना आपल्याला दिसतो. सतराव्या शतकात स्थानिक भाषांवर बंदी आणणं हा एक अपवादात्मक आणि काहीसा आश्चर्यचकित करणारा निर्णय आहे. चर्च कौन्सिलने स्थानिक भाषेत धर्मप्रसार करावा असे ह्याआधीच सांगितले आहे. त्याचाच भाग म्हणून ख्रिस्तपुराण आदी ग्रंथांची निर्मिती झाली नुकतीच झालेली आहे. डॉ अनन्या चक्रवर्ती ह्यांच्या निबंधात धर्मांतरित झालेल्या ख्रिस्ती ब्राह्मणांत ह्या ग्रंथाचे मोठ्या आनंदाने स्वागत होऊन त्याचे सार्वत्रिक वाचन होत असल्याचे त्या जेजुइट पत्रव्यवहाराच्या आधारे मांडतात. मग १६८४ साली नेमके काय घडले ज्यावरून कोंकणीतून धर्मप्रसावर आणि त्याचाच भाग म्हणून कोकणीच्या वापरावर बंदी घालण्यात आली? कारण स्थानिक आहे. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात येईपर्यंत ख्रिस्ती मिश्नर्यांमध्ये एकप्रकारची  सुस्ती येऊन त्यांना स्थानिक भाषा शिकण्यात व त्यातून प्रचार करण्यात रस नाही. व्हाइसरॉयने वारंवार सांगून सुद्धा ते त्यांना जुमानत नाही. शेवटी कंटाळून ह्यांना स्थानिक भाषा शिकण्याची सक्ती करण्यापेक्षा स्थानिक लोकांना पोर्तुगीज शिकवणे अधिक सोपे जाईल ह्या विचाराने हा निर्णय घेतला हे खुद्द रिव्हाराच आपल्याला त्या निबंधात सांगतात. १५१० ते १६८४ हा एकशे चौऱ्याहत्तर वर्षांचा काळ आहे. ह्याकाळात कोकणीचे स्थान पोर्तुगीज दरबारी काय होते वा ह्या दरम्यान आलेल्या फर्मानांमुळे कोकणीवर नेमका काय परिणाम झाला ह्याविषयी नेमकी माहिती असल्याशिवाय अश्या फर्मानांतून राबविलेल्या बंदीचा परिणाम काय आणि किती होता हे नेमकेपणाने सांगणे अवघड. ह्यामुळे ह्या फर्मानामुळेच कोकणीची वाढ खुंटली असे ठोस विधान करणे इतिहासशास्त्राला धरून नाही त्यामुळे निदान मी तरी ते करणार नाही. अश्या स्वरूपाची फर्माने पुढच्या वर्षात परत परत जारी केलेले आपल्याला दिसते व त्यामुळे त्या फर्मानांची अंमलबजावणी कितपत चोख होती ह्याविषयी शंका घ्यायला वाव आहे असे मात्सुकावांचे म्हणणे आहे.

पण सोयीसाठी एकवेळेला हे जरी खरं मानलं कि १६८४सालच्या फर्मानामुळे कोकणीचा वापर गोव्यात एकहाती बंद झाला तर दुसरा तार्किक प्रश्न उपस्थित राहतोच. १६८४ सालापर्यंत आणि तिथून पुढे ७९ वर्षापर्यंत पोर्तुगीज अखत्यारीत केवळ बार्देस, तिसवाडी, मुरगांव आणि सासष्टी हे भाग होते ज्यांना आपण जुन्या काबिजादी म्हणतो. कोंकणी हि जर समग्र गोव्याची भाषा असली तर निदान नव्या काबिजादींमध्ये ती टिकून राहायला पाहिजे होती. तिथेतर कोकणीविरुद्ध कोणतेही फर्मान काढल्याचे ऐकिवात नाही. नव्या काबिजादींतल्या ग्रामसंस्थांचे व्यवहार हे मोडी लिपीत लिहिलेल्या मराठीतून चालत. ते तसेच चालू राहावे असे पोर्तुगिजांनीच काढलेल्या हुकूमनाम्यात लिहिले आहे. हा हुकूमनामा तिथल्या प्रत्येक ग्रामसंस्थांच्या नोंदवहीत उतरवून घेतला आहे. मोडी मराठीत चाललेले हे व्यवहार एकोणिसाव्या शतकापर्यंत चालू राहिले हे गोव्यातल्या अभिलेखागारात असलेल्या रेकॉर्ड्सवरून दिसून येते. मग नव्या काबिजादींत कोंकणी का वापरात आली नाही? उलटपक्षी नव्या काबिजादींच्या समावेशामुळे जो प्रशासकीय पेच पोर्तुगीज सरकारपुढे निर्माण झाला त्यावर उपाय म्हणून मराठीला अधिकृत भाषेचा दर्जा पोर्तुगीजांनी दिला. ८ ऑगस्ट १८४३ साली काढलेल्या परिपत्रकाच्या प्रस्तावनेत पोर्तुगीज सरकारने मराठी शाळा स्थापन करण्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे. मराठी भाषेत मोठ्या संख्येने व्यावहारिक कागदपत्रे होती ज्यावरून न्यायालयीन, आर्थिक तसेच प्रशासकीय निर्णय घेणे अवलंबून होते. अश्या कागदपत्रांचे वाचन तसेच पोर्तुगीज भाषेत अनुवाद करू शकणारे लेखनिक आणि अनुवादक सरकार दरबारी नियुक्त करण्याची गरज पोर्तुगीज सरकारला भासू लागली. म्हणून ह्या मराठी शाळा त्यांनी सुरु केल्या. सखाराम नारायण वाघ हे पोर्तुगीज दरबारी नियुक्त झालेले पहिले मराठी शिक्षक आणि अनुवादक. त्यांच्यानंतर सूर्याजी आनंद राव देशपांडे ह्यांची तिथे वर्णी लागली. सूर्याजी रावांनी आपल्या कार्यकाळात पोर्तुगीज भाषेत मराठीचे व्याकरण लिहिले, व मोल्स्वर्थ शब्दकोशाचा आधार घेऊन पोर्तुगीज मराठी शब्दकोशाची निर्मिती केली. ह्या कोशाच्या पहिल्या भागाच्या मराठी प्रस्तावनेत त्यांनी गोव्यातल्या मराठी भाषेविषयीची स्थानाविषयी सूचक लेखन केलेले आहे. ते लिहितात –

“पुढे नवीन काबिजाद या नामेंकरुन जे प्रांत आहेत ते एकामागे एक आमच्या पोर्तुगेज सरकारच्या ताब्यांत आले तोपासून हिंदुप्रजेचें मान वाढले, त्यांचे सर्व धार्मिक संप्रदाय व इतर हक्क संरक्षण करण्याचे वचन देऊन सदर्हू प्रांतातील प्रजेला सरकाराने सन १७६३ पासून १७८८ पर्यंत आपल्या ताब्यांत आणिलें, तावत्कालापासून सरकारची मेहरबानीची नजर हिंदुलोकांवर होऊ लागली, तेव्हा त्यांचे शिक्षेविषयी आगर कल्याणाविषयी सरकारने जरूर तितकी तजवीज केली, तथापि व्हावी तशी झाली नव्हती, ती अलीकडे लोकांस पोर्तुगीज नगरकरी असे हक्क मिळाल्यापासून होऊ लागली, आणि मराठी पोर्तुगीज लेखन वाचन शिकविण्याबद्दल प्रथमतः सन १८४३ साली या शहरांत सरकारने मराठी शाळा स्थापिली, या शाळांची संख्या आता वाढत चालली आहे, व पुढेही उत्तरोत्तर वाढत जाईल आणि हिंदुलोकांविषयी बरीच तजवीज होईल असी आशा आहे.”

नव्या काबिजादींच्या समावेशानंतर हिंदू समाजाला विशेषतः उच्चवर्णीय हिंदू समाजाला पोर्तुगीज दरबारी सरकारी नोकरीची वाट मराठीच्या ज्ञानामुळे मोकळी झाली. त्याचा पुरेपूर फायदा उठवून त्यांनी आपले जातीवर्चस्व पोर्तुगिजांबरोबर संगनमत करून कायम केले. त्यामुळे गोव्यातील सारस्वतांना मराठीचे वावडे नव्हते हे स्पष्ट आहे. सारस्वतांची भाषा मराठी नाही तर कोंकणी आहे हा मुंबईत बसून लावलेला शोध आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सारस्वतांची मूळ अस्मिता हि कोकणी भाषेशी निगडित आहे अश्या स्वरूपाचे लिखाण आढळते. वामन वर्दे वालावलीकरला  मुंबई वास्तव्यास असताना कोकणीच्या वेगळेपण जाणवते. (पुढे रवींद्र केळेकार आणि दामोदर मावजो ह्यांच्याही लेखनात कोंकणीचे वेगळेपण त्यांना मुंबईपुण्यात जाऊन जाणविल्याचे दोहोंनी लिहिले आहे. योगायोगाने त्या दोहोंनाही ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेशी मुक्कामास राहून कोकणीच्या वेगळेपणासंबंधी दृष्टांत होणाऱ्यांना पुढे ज्ञानपीठ पुरस्कार मिळतो असे मिथक प्रचलित करण्यास वाव आहे. कोकणी साहित्यविश्वातल्या ज्ञानपीठ इच्छूकांनी नोंद घ्यावी.)

हे वेगळेपण जाणवणे काहीसे चमत्कारिक वाटते म्हणून त्याची चिकित्सा करणे क्रमप्राप्त आहे. केवळ सारस्वतच नव्हे तर गोव्यातल्या इतर ज्ञातिवर्गातली बरीच मंडळी मुंबईत वास्तव्यास होती. मग त्यांना हे वेगळेपण का जाणवले नाही? भंडारी समाज, मराठा गायक समाज इत्यादी ज्ञातिसंस्था मुंबईत सक्रिय होत्या पण ह्या सर्व समूहांनी आपली अस्मिता हि मराठा आहे असे घोषित केले होते. प्रा. पराग परोबोंच्या पुस्तकात ह्याविषयी सविस्तर संशोधन आलेले आहे (सुज्ञ वाचकांनी ते पुस्तक जरूर वाचावे. ईंग्रजीबरोबर ते आता मराठीतही उपलब्ध आहे.) मग प्रश्न येतो तो गोमंतकीय सारस्वतांना कोकणी आपली (व हेटाळणी करण्याइतपत मराठी परकी) का वाटावी? दुसरा प्रश्न – गोमंतकीय बहुजनवर्ग मराठीकडे का आकर्षिला गेला?

आतापर्यंत प्रकाशित झालेल्या संशोधनावर आधारित मी काही कयास मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. डॉ उर्मिला पाटील ह्यांनी टेक्सस विद्यापीठात सादर केलेला पीएचडी प्रबंध आणि डॉ जेसन कीथ फर्नांडिस ह्यांनी वालावलीकरावर लिहिलेल्या चरित्रात्मक निबंधावरून मुंबईस्थित सारस्वत ज्ञातीसमूहाने कोकणी भाषेची कास का धरली हे समजण्यास मदत होते. मुंबईस्थित शेणव्यांना स्थानिक चित्पावन समूहातील लोक ब्राह्मण मानत नव्हते. १८६९ साली उद्भवलेल्या मालवणकर-वागळे वादामुळे शेणव्यांचे ब्राह्मणत्व ब्रिटिश कोर्टात पोचून निकाल वागळेंच्या बाजूने लागला. पण ह्या वादामुळे चित्पावन-सारस्वत ज्ञातीकलह चव्हाट्यावर आला. पुढे रा गो भांडारकरांना शास्त्रार्थ सभेत भाग घेण्यापासून मज्जाव करण्यात आला. चित्पावनांकडून येणाऱ्या ह्या आव्हानामुळे आपले ब्राह्मणत्व सिद्ध करणे हि शेणव्यांची तातडीची गरज होती. महाराष्ट्रात ब्राह्मणत्वाच्या सीमा ठरविण्यात चित्पावन अग्रेसर होते. ती मक्तेदारी मोडीत काढणे गरजेचे होते. तसेच ह्या काळात भाषा हा जातवर्चस्व स्थापन करण्यासाठीचा एक प्रमुख घटक होता. ब्रिटिश भारतात भाषेविषयी बरीच उलथापालथ होत होती. शब्दकोश व व्याकरण निर्माण करून भाषेचे प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया सुरु होती. ब्राह्मणांची बोली तीच प्रमाण, शुद्ध भाषा ह्या तत्वावर काम चालले होते. मराठीत साहजिकरीत्या ह्याची सूत्रे चित्पावनांकडे होती. चित्पावनांबरोबर असलेल्या आंतरजातीय कलहातूनच मुंबईतील शेणव्यांना स्वतःची ब्राह्मण अस्मिता हि चित्पावनांपेक्षा वेगळी आहे आणि त्यांच्या अंमलाखाली असलेल्या मराठीऐवजी आपली भाषा कोंकणी आहे असे भासवावे लागले असे फर्नांडिस आणि पाटील ह्यांच्या संशोधनातून दिसून येते. हा केवळ एक मतप्रवाह असून कोकणीशी आपली अस्मिता जोडून घेण्यात काही शेणव्यांचा विरोधही होता असेही दिसून येते. मराठीच्या बाजूने रघुनाथ तळवडकरांसारखे काही सारस्वत उभे राहिले पण स्वातंत्र्योत्तर काळात वालावलीकरला कोकणीचा आद्यपुरुष घोषित केल्याने तोच मतप्रवाह ऐतिहासकीदृष्ट्या प्रबळ बनवला गेला. चित्पावनांकडून होणाऱ्या हेटाळणीमुळे कोकण हे सारस्वतांचे उगमस्थान आहे आणि त्यांची भाषा कोंकणी आहे असे वालावलकर लिहू लागला. (हि प्रक्रिया अजून मोठी व क्लिष्ट आहे. विस्तारभयास्तव इथे काहीसे सुलभीकरण केलेले आहे. इच्छुक वाचकांनी फर्नांडिस ह्यांचा वालावलकरांवरचा निबंध व पाटील ह्यांचा डॉक्टरेट प्रबंध वाचावा. तसेच फ्रँक कॉनलोन, सुझन बेली, पॉली ओ हॅनलॉन इत्यादींचे संशोधन वाचावे जेणेकरून जाती ह्या संकल्पनेबद्दल महाराष्ट्र प्रदेशी काय खल चालला होता ह्याचे आकलन होण्यास सोपे जाईल.)

दुसरा प्रश्न – गोमंतकीय बहुजनवर्गाची भाषिक भूमिका मराठीच्या काठाशी कुठून आली? ह्यात अजून बरेच संशोधन करण्यास वाव आहे व तूर्तास तरी ह्याविषयी मी केवळ काही प्राथमिक तर्क मांडू शकतो. नमूद केल्याप्रमाणे प्रा. पराग परोबोंच्या पुस्तकात गोमंतकीय बहुजनवर्गाच्या मराठाकरणाच्या प्रक्रियेविषयी माहिती आलेली आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यात काम केल्याचा इतिहास क्लेम करून त्यांनी स्वतःला मराठा म्हणविणे सुरु केले होते. ह्यात निश्चितच महाराष्ट्रात जोतीराव फुले, विठ्ठल शिंदे, तुकाराम (तात्या) पडवळ इत्यादी विचारवंतांनी प्रसार केलेल्या बहुजनवादी चिंतनाचाही भाग असावा असे वाटते. त्यामुळे आपल्या जातीय शोषणाला प्रतिकार करण्याची वैचारिक मांडणी मराठीमधून होत असल्याने त्यांना मराठी जवळची वाटली असावी. जातीय विषमतेचा पाशातून बाहेर पाडण्यासाठी गोमंतकीय बहुजनवर्गाचे जे प्रयत्न चालले होते त्याचे मुंबई हे एक प्रमुख केंद्र होते. तिथे स्थायिक झालेल्या गोमंतकीयांकडून आर्थिक आणि इतर मदत मिळत होती. समतेचे एक व्यापक भान गोमंतकीय बहुजनवर्गाला मराठीतून मिळाले ह्याबद्दल दुमत असू शकत नाही. गोमंतकीय बहुजनवर्गाने कोकणीच्या मागे उभे राहण्यासाठी कोकणीने त्या वर्गाला असा कोणता विचार दिला आहे? ‘गावड्यांक शिकोवन पंडित करूया’ हा तो विचार असू शकत नाही.

प्रस्तुत लेखात आतापर्यंत वसाहतकालीन भाषिक वादाचाच परामर्श घेण्यात आला आहे. गोवा स्वातंत्र्यानंतर भाषेच्या चळवळीचे समीकरणे बदलली. त्याचा वेगळा लेखाजोखा केला पाहिजे. सदर लेखाचे ते ध्येय नाही. त्याचे अवलोकन स्वातंत्र्योत्तर काळातल्या देवनागरी कोकणी चळवळीने गोमंतकीय समाजाला कोणता आधुनिक विचार दिला आहे ह्या मुद्द्यावर करणे गरजेचे आहे. कोकणी साहित्यात आजही परिवर्तनवादी, आधुनिक मूल्यांची पाठराखण करणाऱ्या साहित्याची वानवा आहे कारण तिथले लेखक हे सतत प्रादेशिकता सिद्ध करण्यात गुंतलेले असतात. ‘गांवगिऱ्या वाठारांचे’ उदात्तीकरण करण्यापलीकडे क्वचितच ते साहित्य जाते. गाव हि संस्था जातिव्यवस्थेने पुरती जखडली आहे असे डॉ आंबेडकर म्हणायचे. कोकणीत डॉ आंबेडकरांच्या लेखनाचा अनुवाद झाला आहे का? किमान राजाराम पैंगीणकरांच्या ‘मी कोण’ ह्या आत्मचरित्राचा अनुवाद तरी कोंकणीत यायला पाहिजे होता जेणेकरून आज मराठीपासून फारकत घेतलेली जी गोव्यातली तरुण पिढी आहे तिला गोव्यातल्या जातिव्यवस्थेचे सत्य कळले असते. कोकणीने जाती उच्चाटनासाठी कुठला आधुनिक विचार दिला आहे? दिला असता तर सुदीरसूक्तची जी अवहेलना साहित्यिक म्हणवणाऱ्या कोकणीवाद्यांकडून झाली ती कदाचित झाली नसती. गोव्यातल्या जातीय विषमतेवर कोकणी साहित्य चळवळीची भूमिका काय? हे कळण्यासाठी कोकणी साहित्याचे सोशल ऑडिट करणे गरजेचे आहे. एक लिटररी इकॉलॉजी म्हणून सामाजिक विषमतेवर कोकणीने गोमंतकीय समाजात परिवर्तनाच्या कुठल्या शक्यता प्रस्थापित केल्या हे कळले पाहिजे.

निमित्त मावजोंच्या वक्तव्याचे असले तरी मूळ मुद्दा तो नाही. मराठी आणि कोकणी ह्या दोन भाषा गोमंतकीय समाजात काय जबाबदाऱ्या पार पाडत होत्या आणि कोकणी मराठी वादामुळे त्या जबाबदाऱ्यांचे पुढे काय झाले ह्याचा पंचनामा अजून होणे बाकी आहे. केवळ कोकणीच्या वैचारिक दायजावर पोसलेला एकतरी कोकणी विचारवंत गेल्या साडेतीन दशकांत हे करू शकला आहे का? ते केल्याने हरेक प्रयत्नांविपरीतही गोमंतकात मराठीच्या बाजूने अजूनही लोक का उभे राहतात ह्याचे मर्मही कोकणीवाद्यांना कदाचित कळेल. गोमंतकातील मराठीवाद्यांना महाराष्ट्रधार्जिणे म्हणून त्यांना ट्रोल करण्याइतके ते सोपे नक्कीच नाही.

kaustubh
Reads old newspapers and researches on Goan History.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *