सर्बियाची राजाधानी आणि त्याआधी युगोस्लव्हियाची राजधानी म्हणून बेलग्रेड प्रसिद्ध आहे. खरंतर अगदी रोमन साम्राज्यापासूनच ते एक प्रमुख युरोपियन शहर आहे. आम्ही तिथे २०१८ साली जेएनयूतर्फे एका परिषदेसाठी गेलो होतो. सर्बिया देशात जायला भारतीय पासपोर्टधारकांस व्हिजा लागत नाही. पण त्यामुळे तिथले इमिग्रेशन ऑफिसर्स तुमची तितकीच कसून चौकशी करतात.
रशिया-अमेरिकेच्या शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर तिथले कम्युनिस्ट क्रांतिकारी नेते जोसिप टिटो ह्यांनी नॉन अलाईनमेंट मूव्हमेंट (अलिप्त राष्ट्रगट चळवळ) सुरु केली. भारत आणि तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूंचा ह्यात प्रमुख वाटा होता. बेलग्रेड हे नॉन अलायन्ड मूव्हमेंटचे उगमस्थान आहे. त्याच्या स्मरणार्थ नोवी साद आणि जुनं बेलग्रेड ह्या भागांना जोडणाऱ्या एका पुलापाशी एक ओबेलिस्क (दगडी स्तंभ) उभारण्यात आलेला आहे. नॉन अलायन्ड मूव्हमेंटमुळे तिथल्या लोकांमध्ये भारताविषयी आणि नेहरूंविषयी कमालीचा आदर आहे. ह्याची साक्ष देणारा एक छोटासा किस्सा घडला. आमचे जेएनयूमधील काही मित्र बेलग्रेड शहराच्या बाहेर फिरण्यासाठी गेले होते. संध्याकाळी परत येताना उशीर झाला त्यामुळे त्यांनी परत यायची शेवटची बस चुकली. दुसरी कुठली बस मिळेल ह्या प्रतीक्षेत तिथे उभे असता एका म्हाताऱ्या सर्बियन माणसाने त्यांना पाहून आपली गाडी थांबवली. ‘फ्रॉम इंडिया?’ असं विचारत त्यांना गाडीत बसवले आणि नेहरू आणि इंदिरा गांधीविषयी किस्से सांगत बेलग्रेडपर्यंत आणून सोडले.
तिथे बॉलीवूड चित्रपट आणि हिंदी टीव्ही मालिका प्रचंड प्रसिद्ध आहेत. तिथली लोकं ‘बालिका वधू’ हि मालिका अत्यंत आवडीने बघतात असे कळले. बेलग्रेड विद्यापीठातल्या एका मैत्रिणीच्या घरी तिच्या वाढदिवसानिमित्त गेलो होतो. तिथल्या नाट्यविभागात शिकणाऱ्या इतर मुलांशी ओळख झाली. त्यातल्या एकाने आमिर खान आणि काजोल ह्यांच्या ‘फना’ चित्रपटातील गाणी म्हणून दाखवली आणि कबीर बेदी हा त्याचा आवडता अभिनेता असल्याचे सांगितले.
बाल्कन भागातल्या सततच्या राजकीय घडामोडीमुळे सर्बिया हे राष्ट्र आंतरराष्ट्रीय राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय राहिलेलं आहे. आम्ही तिथे असता बोस्नियातील मुसलमान लोकांच्या नरसंहाराची जबाबदारी सर्बियन राज्याने आणि सैन्याने घ्यावी ह्यासाठी निदर्शने चालू होती. ९९ सालात झालेल्या नाटो बॉम्बिंगमध्ये मोडलेल्या काही इमारती अजूनही तश्याच पडझडीच्या अवस्थेत आहेत. टिटोची राजवट पाहिलेल्या पिढीचा एक कम्युनिस्ट नॉस्टॅलजिया आहे. स्टालिनलाही पुरून उरलेल्या हा नेता तिथल्या सोशालिजमच्या अस्तानंतर आजही एक आयकॉन आहे. सोशालिस्ट मॉडर्निज्म ह्या स्थापत्यशास्त्रातील प्रकारच्या अनेक इमारती इथे अजूनही पाहायला मिळतात.
आमचा मुक्काम बेलग्रेड विद्यापीठातल्या एका प्राध्यापिकेच्या घरी होता. एकदा विद्यापीठात जाताना तिने आम्हाला बाहेर इशारा करून एक इमारत दाखवली. ती इमारत तिथल्या कम्युनिस्ट लीगचं प्रमुख कार्यालय होतं. आता तिथे एक बिजनेस सेंटर आणि मॉल आहे.
हा फोटो हा बेलग्रेड शहरातील झेमून ह्या भागातल्या गार्दोस टॉवरचा आहे