२०१७ साली मी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एमफिल करण्यासाठी दाखल झालो. २०१६ पासून बऱ्याच उलथापालथी तिथे घडून गेल्या होत्या. त्यानंतर जेएनयूच्या वातावरणात उत्तरोत्तर बदल होत गेले. त्या बदलांचा मी साक्षीदार आहे. एकेकाळी जगभर प्रतिष्ठेचं मानलं जाणारं हे विद्यापीठ एका हिंस्त्र टीकेचं शिकार बनवून तिथली व्यवस्था बिघडवून टाकली. तिथल्या विद्यार्थ्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. आजही जेएनयूतून पीएचडी करणारा उमर खालिद १५०० दिवस कुठल्याही खटल्याविना तुरुंगात आहे. राष्ट्रीय पातळीवरच्या माध्यमांतून जेएनयूबाबतीत दुष्प्रचार केला गेला. तो आताही अव्याहत चालू आहे. ‘जेएनयू वाले हे, जेएनयू वाले ते, ते दारू पितात, देशद्रोही, राष्ट्रविरोधी, अर्बन नक्षल, डावी वाळवी, दगड न धोंडे!’ पण विद्यापीठाच्या आत ह्या सगळ्या दुष्प्रचाराला पुरून उरणारी आणि नेहमीच अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारी एक वेगळी दुनिया आहे.
मी जेएनयूत असताना हॉस्टेलवर राहत नव्हतो. डे स्कॉलर होतो. दरदिवशी कॅम्पसवर यायचो तेव्हा मुख्य गेटवर सीआरपीएफ व दिल्ली पोलिसांचा पहारा असायचा. वाटायचं आपण एका क्राईम सीनवर प्रवेश करतोय. साध्या वेशात गुप्तचर यंत्रणातील लोक तैनात असायचे. जरा कोणी अनोळखी व्यक्ती कारण नसताना तुमच्याशी बोलू लागली, प्रश्न विचारू लागली तर लगेच सावध होत असू. दर दोन आठवड्यांनी काहीतरी नवीन आदेश, नवीन अध्यादेश काढून विद्यार्थी व शिक्षकांचं जीवन दुष्कर केलं जात होतं. अनेक प्रकारचे प्रशासकीय निर्बंध आणून ते विद्यापीठ आतून पोखरण्याचे प्रयत्न सुरु झाले होते. ते आजही चालू आहेत. पण ह्या सर्वांच्या पलीकडे जाऊन जेएनयूच्या यशाची घोडदौड काही थांबली नाही. आजही भारतातील विद्यापीठांत अग्रक्रमाने जेएनयूचं नाव घेतलं जातं.
जेएनयूविषयी आम्हा विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नॉस्टॅलजिया आहे. ‘विश्वविद्यालय’ हि संज्ञा सार्थ करणारी ती एक वास्तू आहे. त्याविषयी, तिच्या इतिहासाविषयी मी फार काही लिहू इच्छित नाही पण तो इतिहास जरूर वाचावा. आलेफ बुक कंपनीतर्फे ‘जेएनयू स्टोरीज’ नावाचं एक पुस्तक प्रकाशित झालं आहे ते तर नक्की वाचा. जेएनयूविषयी सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे तिथे तुम्हाला मिळत असलेलं समाजाचं, जगाचं एक व्यापक भान. मी गेल्या दहा वर्षात संशोधनानिमित्त जगभरातल्या बऱ्याच विद्यापीठांना भेट दिली आहे. त्यात दोन गोष्टी ठळक जाणवल्या. पहिली म्हणजे ह्या विद्यापीठांच्या तुलनेने जेएनयू कुठेही कमी नाही. कमीतकमी संसाधनांमध्ये आंतरराष्ट्रीय तोडीचं शिक्षण तिथं मिळतं आणि असं विद्यापीठ आपल्या भारतात आहे हे खरंतर आपलं भाग्य समजलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जगभरातल्या विद्यापीठांत जेएनयूचा दबदबा आहे. त्यामुळे तुम्ही जेएनयूचे विद्यार्थी आहेत हे कळल्यावर तिथे तुम्हाला प्रचंड आदराने वागवतात हे मी स्वतः अनुभवलं आहे. ह्यात कसलीही अतिशयोक्ती नाही. मी सद्या अमेरिकेतल्या एका प्रतिष्ठित खाजगी विद्यापीठात पीएचडी करतो आहे. इथे पैसे, संसाधने इत्यादींची कमतरता नाही. मागाल ते मिळतं. कोव्हीड काळात घरी बसून ऑनलाईन क्लासेस नीट अटेंड करता यावे म्हणून मी घेतलेल्या खुर्चीचे सुद्धा पैसे माझ्या विद्यापीठाने दिले होते. अमेरिकेतली सात जुनी आणि प्रमुख विद्यापीठांचा एका समूह आहे ज्याला ‘आयव्ही लीग’ असे म्हणतात. ह्यात हार्वर्ड, कोलंबिया, कॉर्नेल, प्रिन्स्टन, ड्यूक, ब्राऊन आणि मी शिकत असलेलं पेन ह्या विद्यापीठांचा त्यात समावेश आहे. तिथे शिकण्याएवढी व पदवीच्या मुलांना शिकवण्यासाठीची पात्रता व तयारी मी कुठे आत्मसात केली असेन तर जेएनयूमध्येच. आज अमेरिका, ब्रिटन, युरोप ह्यासारख्या प्रदेशांतल्या विद्यापीठांमध्ये भारताविषयी खूप महत्वाचे संशोधन चालू आहे. हे करणारे आणि अश्या विद्यापीठात शिकवणाऱ्यांपैकी बरेचसे लोक हे जेएनयूचे माजी विद्यार्थी आहेत. तात्पर्य, कोणी कितीही दुष्प्रचार केला तरी ज्ञाननिर्मितीतला जेएनयूचा जागतिक दबदबा हा अढळपदी जाऊन बसलेला आहे.
इथे सरळधोपट शिक्षण नाही. आपल्याच विषयात रमणारे लोक नाही. मी तिथं कला व सौंदर्यशास्त्र विभागात शिकत होतो पण इतिहास, समाजशास्त्र, भाषा, आंतरराष्ट्रीय संबंध इत्यादी शाखांतल्या कार्यक्रमांना हजेरी लावायला मिळत असे. जेएनयूतल्या विद्यार्थी संस्कृतीचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘मेस टॉक्स’ – रात्री जेवण संपल्यानंतर मेसमध्ये होणारी व्याख्याने. प्रत्येक मेसमध्ये अश्या व्याख्यानांचे आयोजन होत असे. लेखक, विचारवंत, राजकारणी, संशोधक, पत्रकार, विविध राज्यांतले खासदार आदी तिथे येऊन विद्याथ्यांशी संवाद साधत. इथे शिकवणारेही लोक मातब्बर – रोमिला थापर, गोपाळ गुरु, सुखदेव थोरात, प्रभात पटनाईक, जयती घोष, सौम्यव्रत चौधरी! सौम्यव्रत चौधरी हे माझ्या विभागातले प्राध्यापक. त्यांच्या तासाला तर जेएनयूतल्या इतर विभागातूनच नव्हे तर आयआयटी, दिल्ली विश्वविद्यालय सारख्या इतर संस्थातूनही विद्यार्थी येत असत. जयती घोष ह्या जेएनयूतल्या एक प्राध्यापिका. संयुक्त राष्ट्राच्या समित्यांवर वगैरे त्यांची नेमणूक असे. त्या जगप्रसिद्ध अर्थतज्ञ आहेत पण आम्हाला त्यांनी इटालियन ऑपेरावर वर्ग घेतले होते. अशी प्राध्यापक नावाच्या चौकटीत न बसणारी लोकं तिथ प्राध्यापक म्हणून होती ज्यांनी आमचं विद्यार्थी जीवन समृद्ध केलं. एकदा मी आणि माझा अमेरिकेतील रूममेट नझर खालिद फिलाडेल्फियातल्या फार्मर्स मार्केटमध्ये फिरत होतो. आम्ही दोघेही जेएनयूचे विद्यार्थी. तिथे एका तरुणाशी बातचीत करता आम्ही भारतीय आहोत हे कळल्यावर तुम्ही प्रभात पटनाईक ह्यांना ओळखता का असा प्रश्न त्याने केला. मी म्हणालो, “हो, आम्ही तर त्यांच्या विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत. नझर इकोनॉमिक्स शिकता असताना जेएनयूत त्यांचा विद्यार्थी होता”. हे ऐकल्यावर त्याने नझरला मिठीच मारली. प्रभात पटनाईक, जयती घोष ह्यासारख्या लोकांनी परदेशातील संधी, तिथल्या नोकरी सोडून जेएनयूत येऊन शिकवले, त्या त्या शाखांत नवीन विद्यार्थी घडवल्या.
जेएनयूबद्दल अनेक गैरसमज लोकांमध्ये पसरवले गेले आहेत. इथली मुलं केवळ निषेध करत फिरत असतात असा काहीसा तो समज. वास्तविक लोकांना एका विद्यापीठीय अवकाशात काय काम होतं ते माहित नसतं. विद्यापीठात बऱ्याच गोष्टी तडकाफडकी होतात. बरेच निर्णय हे सर्वसमावेशक नसतात. ते सर्वांच्या हिताचे व्हावे ह्यासाठी जेएनयूमध्ये सुरुवातीपासून विद्यार्थी चळवळीची परंपरा राहिली आहे. जेएनयू संस्कृतीच्या केंद्रस्थानी असलेल्या बऱ्याच गोष्टी ह्या विद्यार्थ्यांच्या चळवळीमुळे तिथे सुरु झाल्या आहेत. लोकशाहीत आपले हक्क मिळविण्यासाठी आपण विविध लढे उभारतो तर विद्यार्थी तरी त्या प्रक्रियेत अपवाद का ठरावेत?
दुसरी गोष्ट आहे ती इथे आकारल्या जाणाऱ्या फीची. सेमिस्टरला दोनशे रुपये व हॉस्टेल मेसचे दोन तीन हजार रुपये एवढाच काय तो खर्च. त्यामुळे समाजातील अत्यंत गरीब घरातला विद्यार्थीदेखील इथे कुठल्याही आर्थिक ताणाशिवाय शिक्षण घेऊन शकतो. अश्या घरातून येऊन पुढे आयएएस, किंवा पीएचडी व नोकरीनिमित्त परदेशी गेलेले अनेक विद्यार्थी आम्ही बघितले आहेत. कितीतरी कुटुंबं जेएनयूतल्या संधीमुळे आर्थिक विवंचनेतून बाहेर आली. अश्या गोष्टी सरकारी अनुदानित विद्यापीठांतच पाहायला मिळतील. तुलनेसाठी दिल्लीमधल्याच अशोका युनिव्हर्सिटी नावाच्या खाजगी विद्यापीठात एका वर्षाची फी सुमारे दहा लाख रुपये आहे व होस्टेलचे दोन लाख रुपये भरावे लागतात ते वेगळे. कुठल्या वर्गाला परवडणार आहे हे शिक्षण?
हल्लीच गोवा विद्यापीठाचे मानांकन घसरले म्हणून बराच खल झाला. अगदी सत्ताधारी पक्षातील एका पदाधिकाऱ्यानेही गोवा विद्यापीठाच्या ढासळत्या स्तराविषयी वर्तमानपत्रात लिहून सरकारला घरचा आहेर दिला. दुसरीकडे गोव्यात चार नवीन खाजगी विद्यापीठे येऊ घातली आहे अशी बातमी होती. सरकारी विद्यापीठांची घसरण आणि उच्च शिक्षणाचं झपाट्यानं होणारं खाजगीकरण ह्यामधील नातं जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत जेएनयूमध्ये सुरु असलेल्या गोंधळाचं मूळ स्वरूप आपल्या लक्षात येणार नाही. उच्च शिक्षणासाठीचं असलेलं बजेट कमी होत आहे. सरकारी अनुदान मिळत असलेल्या संस्थांनाही स्वतःचे पैशे स्वतः उभे करा अशी फर्मानं सरकारकडून दिली जात आहेत. तसे केले नाही तर मूल्यमापनात त्यांचं रँकिंग कमी केलं जातं. हळूहळू सरकारी विद्यापीठं बंद करून शिक्षणक्षेत्रात खाजगीकरणला प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे वार्षिक बारा लाख रुपये फी भरण्याची ऐपत असलेल्यांनाच खाजगी विद्यापीठातून चांगल्या दर्जाचं शिक्षण प्राप्त करण्याची संधी मिळेल.
शिक्षण हा आपला मूलभूत हक्क आहे आणि तो आपल्याला कमीत कमी किमतीत देणे हि सरकारची नैतिक जबाबदारी आहे. एक प्रगत राष्ट्र बनण्याची ती प्राथमिक पायरी आहे. पण ह्या वाढत्या खाजगीकरणामुळे शिक्षण हि केवळ पैसे देऊन विकत घेता येणारी सेवा बनावी अश्या स्वरूपाची तरतूद करण्यात येत आहे. नुकतंच येऊ घातलेलं नवं शैक्षणिक धोरण त्याच कारस्थानाची नांदी आहे. विषय निवडीच्या स्वातंत्र्याखाली शिक्षणाचं बाजारीकरण केलं जातंय. जोपर्यंत आपल्याला हे समजेल तोपर्यंत बराच उशीर झालेला असेल. गेली अनेक वर्षे जेएनयूतल्या विद्यार्थी व शिक्षकांनी ह्याविरुद्व आवाज उठवला आहे. शिक्षणाच्या बेछूट खाजगीकरणाविरुद्ध चळवळ उभी केली होती. जेएनयूविरुद्ध सातत्याने होणारा दुष्प्रचार जरी डाव्या विरुद्ध उजव्या विचारसरणीबद्दल वाटत असला तरी ते त्याचं मूळ कारण नाही. जेएनयूसारखं एखादं विद्यापीठ हे सरकारी अनुदानित शिक्षण संस्थेच्या यशाचं एक मॉडेल आहे. खाजगी विद्यापीठांच्या भरभराटीसाठी ते अडचणीचं ठरतं म्हणूनच जेएनयू नष्ट करणं गरजेचं आहे. जेएनयूमध्ये उभी राहिलेली चळवळ हि केवळ जेएनयूचीच स्वायत्तता अबाधित राहावी म्हणून नाही तर देशातली सगळी सरकारी विद्यापीठं व तिथे सामाजिक बदलाच्या असलेल्या शक्यता कायम राहाव्यात म्हणून होती. त्यामुळे जेएनयूला व तिथे शिकणाऱ्या लोकांना कितीही नावं ठेवावीत. त्यानं आमच्यासारख्यांचं फारसं काही बिघडणार नाही. जेएनयूचा शिक्का इतका मजबूत आहे कि भारतात नाही तर इतर कुठेतरी अर्थार्जनाची व्यवस्था होईलच. पण जेएनयूला नावं ठेवणाऱ्यांनी स्वतःच्या पाल्याच्या उच्च शिक्षणासाठी दरवर्षी बारा लाख खर्चण्याची आपली ऐपत आहे का नाही हे तपासत रहावं.