ओपिनियन पोलचे कवित्व

सोळा जानेवारी आला कि गोव्यात अनेकांना ओपिनियन पोलच्या आठवणींचे उमाळे येतात आणि गोव्याची अस्मिताय कशी सांभाळून ठेवली ह्यावर सदगदित होत असतात.  यंदा जनमत कौलाची साठ वर्षे म्हणून अनेकांना फुटू नये तेवढा कंठ फुटला होता. ह्या सर्व विलापाचा एकच सूर – गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण होणे हि गोव्याच्या इतिहासातली सर्वात धोकादायक घटना होती आणि ती जनमत कौलामुळे टळली!

म्हाळ पै वेर्णेकरने आपल्या धंद्याच्या फायद्यासाठी जेव्हा अल्बुकर्कला गोव्यात बोलावले आणि पोर्तुगीजांचे राज्य समस्त गोव्याच्या माथी मारले ते गोव्यासाठी धोक्याचे नव्हते. नव्या काबिजादीत देसकत भोगणाऱ्यांनी जेव्हा इश्तादोच्या आजन्म सेवेची शपथ घेतली तेव्हाही गोव्याची अस्मिता डगमगली नाही. इतकेच का, गेलाबाजार सालाझारने गोवा हा पोर्तुगालचाच एक ऑफशोर प्रांत आहे अशी उठवलेली आवईही कुठल्याही तणावाशिवाय आपण पचवली. पण गोमंतकीय समाजाला महाराष्ट्रात विलीनीकरणाच्या कल्पनेने एवढी का धास्ती भरावी हा यक्षप्रश्न उरतोच.

विलीनीकरणाच्या ह्या नतद्रष्ट संकल्पनेचा मुख्य आरोपी कोण तर भाऊसाहेब बांदोडकर, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, आणि साहजिकच ज्या ४४ टक्के लोकांनी विलीनीकरणाच्या बाजूने मतदान केले ते लोक. हे गोव्याचे खरे दुश्मन! ४४ टक्के म्हणजे काही महत्व देण्याइतका आकडा नसावा. गोव्यातल्या काही टक्का असलेल्या उच्च्भ्रू वर्गाला आपल्या हातून सत्ता निसटून जाईल हि चिंता गोव्यातील सुमारे अर्ध्या जनतेच्या कौलापेक्षाही महत्वाची आहे हे आपण विसरता कामा नये. भले महात्मा गांधींनी बाकीबाब बोरकरांना गोव्यातील साडेचार लाख लोकांनी पोर्तुगीजांची सत्ता नको असेल तर मुंबईत येऊन स्थायिक व्हावे असे सुचवले असेल, किंवा विलीनीकरणाचा एकूण मुद्दा हा बांदोडकरांच्याही आधी सुरु झाला असेल, विलीनीकरणाला अगदी उंबरठ्यावर आणून ठेवणारे एकटे बांदोडकरांनाच ह्या पापाचे भागीदार ठरवणे सोयीस्कर आहे.

बांदोडकरांचे राजकारण काय तर शेतमजुरांच्या नावावर त्यांनी कसलेल्या जमिनीची मालकी करायची? मुंडकारांना राहत्या घराचे अधिकार द्यायचे? आणि सर्वात धोकादायक म्हणजे शतकानुशतके पिचलेल्या बहुजन समाजासाठी गावोगावी शाळा सुरु करून त्यांना ज्ञानगंगेत ओढायचे? मग भाटकाराच्या भाटात काय स्वतः भाटकाराने राबायचे? गोव्यातल्या गरीब बिचाऱ्या भाटकारांनी आपली सत्ता, जमीनजुमला, जातीय वर्चस्व हे अबाधित राखण्यासाठी किती कष्ट केले हे बांदोडकरांना ठाऊक नाही? त्यासाठी भाटकार वर्गाने पोर्तुगीजांशी कध्धी कध्धी संगनमत केले नाही. पण ह्या बहुजनांना लोकशाहीत मतदानाचे अधिकार काय मिळाले, त्यांनी भाटकरांना सत्तेत न आणता बांदोडकरांना सत्तेत आणले?

ह्या विलापिकेचा एकूण अर्क काढल्यावर लक्षात येते कि खरे तर गोव्यातील उच्चवर्णीयांनी बांदोडकरांचे आभारच मानले पाहिजेत. बांदोडकर हे स्वतंत्र गोमंतकातील एक सोयीचे खलनायक आहेत ज्यांच्यामुळे पोर्तुगीजांशी सलोखा ठेवणाऱ्या समूहांना आज देशभक्त म्हणून मिरवता येते. इतिहासाची संपूर्ण नैतिक जबाबदारी विलीनीकरणावर एकवटून हे समूह पोर्तुगीज राजवटीत आपण शतकानुशतके जे फायदे लुटले त्यावरून लोकांचे लक्ष अत्यंत चलाखीने विचलित करू शकतात.

गोवा विलीन करायला निघालेले बांदोडकर जर ‘गद्दार’ असतील, तर ज्यांनी निष्ठेने पोर्तुगीजांची चाकरी केली ते आपोआप गोव्याचे ‘रक्षक’ ठरतात. त्यांना पोर्तुगीज राजवटीतल्या त्यांच्या सहभागाचे किंवा लाटलेल्या फायद्यांचे प्रायश्चित्त घेण्याची गरज उरत नाही. त्यांनी फक्त बांदोडकरांकडे व मगोकडे बोट दाखवून ‘अस्मितायेवर संकट’ म्हणून ओरडा करायचा. बांदोडकर हा एक अंधार आहे, ज्यामुळे यांचा डागाळलेला इतिहास प्रकाशासारखा उजळून निघतो.

दुर्दैवाने बांदोडकरांनी ज्या वर्गाचा उद्धार करण्याचा प्रयत्न केला, त्या वर्गाच्या पिढीजात मौनामुळे ही मांडणी करणे उच्चवर्णीयांना अधिकच सोपे झाले आहे. विषमतेच्या विळख्यातून ज्या बहुजन समाजाला त्यांनी बाहेर काढले, त्या समाजाने बांदोडकरांचा कोणताही भक्कम असा वैचारिक किंवा सार्वजनिक वारसा उभा केला नाही. त्यांच्या कुळ कायद्याचे लाभार्थी कदाचित त्यांच्या प्रलंबित मुंडकारी खटल्यात इतके व्यस्त आहेत की त्यांना या अस्मितायेच्या सांस्कृतिक युद्धात उतरायला वेळच नसावा.

अश्या प्रतिवादाचा अभाव असल्यानेच बांदोडकरांचे ‘खलनायकीकरण’ करणे अत्यंत सोपे जाते. यामुळे उच्चभ्रूंना आपसूक इतिहास कथनाची मक्तेदारी मिळते. ज्या माणसाने बहुजनांसाठी शाळा उघडल्या तो गद्दार आणि जे त्या शाळांचे दरवाजे इतरांसाठी अडवून बसले होते ते मात्र अस्मितायेचे रक्षक’ म्हणून सन्मान मिळवतात.

आता कोणी हा प्रश्न विचारू नये की ही जपलेली तथाकथित ‘अस्मिता’ कुणासाठी होती. ज्या लोकांनी भाटकाराच्या अंगठ्याखाली राहण्यापेक्षा पारंपरिक सत्तेची गणिते कोलमडून पाडणाऱ्या एका नवीन राजकीय चौकटीची निवड केली त्या लोकांना ह्या अस्मितायेत स्थान आहे का? आपण फक्त आभार मानले पाहिजेत की गोव्यातल्या पारंपरिक सत्तांध वर्गाला आपल्या भूतकाळातील पापांतून मुक्त करणारा एक ‘परफेक्ट व्हिलन’ सापडला आणि त्यांनी गोव्याला लोकशाही मार्गाने येऊ घातलेल्या समानतेच्या भयंकर संकटापासून वाचवले.

kaustubh
Reads old newspapers and researches on Goan History.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *