गेल्या काही वर्षात कुणबी साडी हि गोव्याची ओळख म्हणून पुढे करण्याचे प्रयत्न चालू आहेत. वेंडेल रॉड्रिगीस, वर्मा डिमेलो सारख्या फॅशन डिझायनर्सनी कुणबी साडी वापरून तिला आधुनिक रूप देण्याचे काम केले आहे. आता सरकारी पातळीवरही तिला जीआय टॅग देण्याची प्रक्रिया सुरु आहे. भारतातील विविध भागात जश्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या लोकप्रिय आहेत त्याच धर्तीवर गोव्याची ओळख कुणबी साडीपासून व्हावी ह्यात गैर काहीच नाही. पण कुणबी साडीच्या ह्या बाजाराभिमुख अवतारात कुणबी समुदाय, विशेष करून कुणबी स्त्रिया कुठे आहेत? कुणबी साडीला मिळणाऱ्या बाजारपेठेतील किती टक्के नफा हा कुणबी स्त्रियांकडे पोचतो आणि इतक्या वर्षात कुणबी समूहातून एखाददुसरा फॅशन डिझायनर का निर्माण झाला नाही?
श्रमिक समूहांच्या संस्कृतीचा वापर करून त्यापासून सत्तेसाठी सोयीस्कर अस्मितांची निर्मिती करणे हि एक जुनी खोड आहे. गोवाही त्याला अपवाद नाही. पण ते करताना ज्या समूहांची संस्कृती आपण बाजारपेठेत आणून उभी करत आहोत त्या समूहाला तिचा नगण्य फायदा मिळणे व त्या संस्कृतीबद्दल ज्ञाननिर्मिती करण्याची मक्तेदारी उच्च्भ्रू आणि सत्तधारी वर्गाकडे जाणे हे एकप्रकारचे शोषणच आहे. उदाहरणार्थ सांगायचे झाले तर गोव्याची लोकसंस्कृती गोव्यातील कित्येक समूहांनी जपली पण त्यावर तज्ञ म्हणून नावारूपास आले फळदेसाई आणि खेडेकर. ज्यांच्याकडून माहिती घेऊन ह्यांनी पुस्तके लिहिली त्या असंख्य गोमंतकीयांची नावे तरी आपल्याला आज माहित आहे का? कुणबी साडीचेही तसेच आहे. गोमंतकीय सधन वर्गातील स्त्रियांमध्ये कुणबी साडीची क्रेझ पाहता प्रश्न असा पडतो कि हे जे तथाकथित फॅशन डिझायनर्स ज्या कुणबी स्त्रियांकडून विणकाम, रंगनिर्मिती वगैरे शिकतात त्यांची नावे कधीच पुढे का येत नाही? त्यांचे कोणी शोज आयोजित करत नाहीत आणि कुठलाही चॅनल त्यांचा मुलाखती घेत नाही. ज्या महागड्या स्टुडियोमध्ये ह्या साड्या विकल्या जातात तिथे ह्या कुणबींना त्यांच्या साड्या परवडणे दूर, त्यांना तिथे निसंकोच प्रवेशही करता येईल ह्याविषयी शंका आहे. संस्कृती जपण्याच्या नावाखाली हि दिवसाढवळ्या केलेली लूट आहे.

गोव्याच्या पर्यटनविश्वात अजून एक हमखास विकला जाणारा सांस्कृतिक प्रॉडक्ट म्हणजे सारस्वत फूड. आता ह्यात इतर ज्ञातीसमूहांकडे बनणाऱ्या पदार्थांचा अंतर्भाव असला तरीही संबंध गोमंतकीय खाद्यसंस्कृतीची ओळख हि एका ज्ञातीसमूहाच्या नावाने प्रचलित केली गेली आहे. पण ‘सारस्वत फूड’ ह्या लेबलखाली कुठले पदार्थ असावेत, किंवा कुठल्या पदार्थात हिंग कमी टाकलं तर ते सारस्वतेतर फूड गणलं जाईल का नाही हे ठरवण्याचा मक्ता आज त्या समूहाकडे आहे. अस्सल सारस्वत फूड हे त्यांनीच चालवलेल्या खानावळीत मिळतं आणि ते किती किमतीला विकावं हेही तेच ठरवतात. पण हातमागावर कुणबी साडी विणणाऱ्या स्त्रिया ह्या अदृश्यच असतात. त्यांच्या संस्कृतीबद्दल सामान्य गोवेकराला कितीशी माहिती आहे? त्यांनी विणलेल्या कापडाचे भवितव्य काय, त्या ज्ञानाचं पेटंट कुणाकडे राहील, ते कुठल्या किमतीत विकलं जाईल इत्यादी गोष्टी ठरविण्यात कुणबी समूहाची किती भागेदारी आहे? त्यांच्या श्रमावर तथाकथित फॅशन डिझायनर्स आपले फॅशन शोज करतात, सधन स्त्रिया ठेकेदार बनून कुणबी साड्या विकण्याचे व्यवसाय सुरु करतात पण त्याचा किलोभरही फायदा ती साडी निर्माण करणाऱ्या स्त्रियांकडे पोचत नसेल तर हे निव्वळ शोषण आहे. कुणबी स्त्रियांनी आपलं घर, आपलं ज्ञान ह्या लोकांसाठी खुलं करावं आणि ह्या लोकांनी कुणबी स्त्रियांना कुठलंही क्रेडिट न देता ते लुटून न्यावं हा कुठला न्याय झाला. ह्या ठेकेदार वर्गाच्या फायद्यासाठी आपली संस्कृती जपावी?
आणि कुणबी साडीला मुख्य धारेत आणण्याच्या प्रक्रियेत कुणबी समूह मुख्यधारेत आला आहे का? कुणबी स्त्रियांना कुणबी साडी नेसण्याबद्दल काय वाटतं ह्यांच्याविषयी त्यांना कोणी विचारलं आहे का? त्या समूहासंबधी असलेली असमानतेची नजर आजही पुसली कायम आहे. जर ह्या साडीमुळे त्यांची जात अधोरेखित होऊन त्यांना भेदभावाचा सामना करावा लागणार असेल तर त्यांना हि साडी नेसून सार्वजनिक ठिकाणी कुठल्या मनस्थितीतून जावे लागत असेल? पण एवढ्या हौसेने कुणबी साड्या मिरविणाऱ्यांच्या वाटेला कुणबी स्त्रियांच्या नशिबी असलेले भोग वाट्याला आलेत का? सतत शेतात वाकून काम करणे, चेहऱ्यावरून ओघळणारा घाम टिपणे ह्या सगळ्या प्रक्रियांना पूरक अशी तिची नेसण्याची पद्धत होती पण तिच्या ह्या बाजारपेठही अवतारात ह्या सगळ्या गोष्टी पुसून टाकल्या गेल्या आहेत. कुणबी साडीचे भवितव्य काय हे ठरविण्याचा अधिकार हा कुणबी स्त्रियांकडे असला पाहिजे. तिची उन्नती व्हायची असेल तर त्यांच्या येणाऱ्या पिढीला शिक्षण द्या, त्यांच्यातल्या कोणाला आवड असेल तर त्यांना एनआयडी, निफ्ट सारख्या संस्थांमध्ये किंवा परदेशात पाठवून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती द्या. त्यांचे फॅशन शोज आयोजित करा आणि त्यांना नावाजलेले डिझायनर्स बनवा. त्यांच्या जीवावर आपले नाव व नफा कमावणे बंद करा.