‘भाषा म्हणून मराठी स्वीकारार्ह, राजभाषा म्हणून नव्हे’ ह्या मथळ्याचा लेख अनंत अग्नी सरांनी मंगळवारच्या लोकमतमध्ये प्रकाशित केला आहे. त्या लेखात काही त्रुटी आणि तार्किक विसंगती आहेत पण त्या लेखात एक ऐतिहासिक मुद्दा अग्नी सरांनी उपस्थित केला आहे व त्यावर ऐतिहासिक संदर्भासहित स्पष्टीकरण देणे क्रमप्राप्त आहे. ते लिहितात
‘मराठी गोव्याची आद्यभाषा असती तर धर्मांतरानंतर ख्रिस्ती समाजाने ती का वापरली नाही? धर्मांतरित ख्रिस्ती समाजावर कोंकणी भाषेच्या वापराची सक्ती पोर्तुगाली शासनाने केल्याची माहिती मला तरी नाही”.
ख्रिस्ती गोमंतकीयांच्या मराठी भाषेच्या वापराबाबतीत अनेक लोकांनी लिहिले आहे पण कदाचित अग्नी सरांनी ते वाचले नसेल. ह्या विषयावर अधिकारवाणीने खुद्द अ. का. प्रियोळकरांनी सविस्तर लिहिले आहे पण प्रियोळकरांचे मराठीप्रेम जगजाहीर आहे आणि कोकणीला मराठीची बोली म्हणण्याचा त्यांचा अट्टाहास कदाचित आता कालबाह्य वाटत असावा. तात्पर्य, प्रियोळकर हे कोकणीबाबतीत पक्षपाती आहेत त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या संदर्भाचा दाखला इथे नको. त्यापेक्षा मी डॉ. पांडुरंग पिसुर्लेकरांच्या एका लेखाचा दाखला इथे देतो जेणेकरून गोव्यातील ख्रिस्ती लोकांमध्ये मराठीचा काय वापर होत होता ह्यावर थोडासा प्रकाश पडेल. हल्लीच उदय भेमरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबतीत केलेल्या वक्तव्यामुळे जो वाद निर्माण झाला त्या इतिहास मंथनात डॉ. पिसुर्लेकर ह्यांना एक निर्विवाद इतिहासकार म्हणून खुद्द कोकणीच्या म्हालगड्यांनीच प्रमाणित केले आहे. त्यामुळे पिसुर्लेकरांच्या संशोधनाविषयी शंका घेण्याचे कारण नसावे.
पिसुर्लेकरांनी आपले बरेचसे लेखन पोर्तुगीज भाषेत केले आहे. त्यातला एक लेख म्हणजे ‘अ प्रोपोजितु दूश प्रीमैरुश लिव्हरुश माराताश इम्प्रेसौइश ए गोवा’ (गोव्यात मुद्रित झालेल्या पहिल्या मराठी पुस्तकांविषयी) हा होय. हा लेख ‘बोलेतीं दू इंश्तीत्युतू वाश्कु द गामा’ ह्या पोर्तुगीज नियतकालिकाच्या १९५६ साली प्रकाशित झालेल्या ७३व्या अंकात छापला होता. गोव्यातल्या मुद्रणकलेच्या ४०० वर्षांच्या इतिहासावर काढलेला हा एक विशेष अंक होता. त्यात पिसुर्लेकर बऱ्याच गोष्टी लिहितात ज्यातून ख्रिस्ती समाजात व एकूणच गोव्यात मराठीचा वापर कसा सुरु होता त्याविषयी आपल्याला माहिती मिळते.
कोकणीवाद्यांमध्ये एक प्रचलित समज आहे. तो असा कि पोर्तुगीजांच्या आगमनाआधी नागरी लिपीतले लिखित कोकणी साहित्य गोव्यात (जुन्या काबिजादीत?) अस्तित्वात होते पण धर्मांतरणाच्या वेळी ते साहित्य पोर्तुगीजांनी नष्ट केले. पिसुर्लेकरांच्या मते हे ठाम चूक आहे. ते सांगतात कि पोर्तुगीजांनी नष्ट केलेले साहित्य हे कोंकणीत नसून मराठी व संस्कृत मध्ये लिहिले आहे. पोर्तुगीजांच्या पत्रव्यवहारातून ह्या दोन्ही भाषेत गोव्यात लेखन चालू होते असे उल्लेख मिळतात. ह्यातली बरीचशी हस्तलिखिते हि धार्मिक साहित्यासंबधित होती व पोर्तुगीजांनी धर्मांतरणाच्या वेळी ती लोकांकडून जप्त केली. त्यातल्या काही हस्तलिखितांची नक्कल रोमन लिपीमध्ये करून वा काहींचा गोषवारा पोर्तुगीज भाषेत लिहून ती जेजूइट मिशनऱ्यांनी सांभाळून ठेवली होती. हिंदूंच्या धार्मिक संकल्पना समजून हिंदू धर्मग्रंथांत जे काही लिहिले होते, त्याविरुद्ध प्रत्युत्तर देणे व त्यांना ख्रिस्ती धर्माची शिकवण देणे सोपे जाईल हा त्या संकलनामागचा हेतू होता. त्यापैकी अमृतानंद यांनी रचलेले योगराज-तिलक, मुकुंदराज रचित विवेकसिंधू, ज्ञानेश्वरी, विष्णुदास नामा ह्यांचे साहित्य, अनादी पुराण सारख्या हस्तलिखितांची रोमी लिपीतील नक्कल वा पोर्तुगीज भाषेतले गोषवारे रोम, एव्होरा, ब्रागा सारख्या युरोपियन शहरांतील वाचनालयांमध्ये सापडल्याचे पिसुर्लेकर नमूद करतात.
फादर थॉमस स्टीफन्स ह्यांनी १६१६ साली मराठीत ख्रिस्तपुराण रचले हे सर्वश्रुत आहे. पण मराठी जाणणारे किंवा मराठीत लेखन करणारे स्टीफन्स हे त्याकाळचे गोव्यातले काही एकटेच ख्रिस्ती मिशनरी नव्हते. त्यांच्या आधीही गोव्यात कार्यरत असलेले परदेशी तसेच स्थानिक ख्रिस्ती मिशनरी मराठीत लेखन व वाचन करीत असत. पिसुर्लेकर लिहितात कि १५६० साली गोव्यातल्या सेंट पॉल कॉलेजमध्ये अंजदीवच्या एका संन्याश्यासोबत झालेल्या वादविवादात फादर फ्रांसिश्कु रॉयज ह्यांनी भगवदगीता व योगराज-तिलक ह्या ग्रंथांचा उल्लेख केला. जेजुइटांचे मराठीचे अध्ययन व त्यात साहित्यनिर्मिती हि स्थानिक धर्मांतरित ख्रिस्त्यांच्या साहाय्याने होत होती. त्यात मानुएल ओलीव्हेरा व जेजुइट भाषातज्ज्ञ फ्रांसिश्कु रोदरीगिश ह्यांचे सहाय्यक आंद्रे वाझ ह्यासारख्या स्थानिक लोकांचा उल्लेख आपल्याला पिसुर्लेकरांच्या लेखात मिळतो. फादर स्टीफन्सनंतर राशोल सेमिनारीत आलेल्या फादर क्रुव्हा ह्यांनी १६२९ साली पीटर पुराण लिहिले आहे
सतराव्या शतकाच्या सुरुवातीस लिहिलेल्या ख्रिस्तपुराणाचे वाचन हे मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने गोव्यात होत होते आणि हि प्रथा अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात सुद्धा चालू होती. ह्यावर १७७६ साली आर्चबिशप फ्रांसिश्कु असुंसांव ह्यांनी बेजा शहराचे बिशप फ्रियर मॅन्युएल ह्यांना लिहिलेल्या एका पत्राचा दाखला पिसुर्लेकर देतात. ह्या पत्रात ख्रिस्तपुराणाच्या सार्वजनिक वाचनावर बंदी आणण्याची मागणी असुंसांव करतात. ह्या पत्रात आर्चबिशप असुंसांव लिहितात कि गोव्यातल्या चर्चमध्ये काही पुस्तकांचे वाचन मराठीत होते व त्यावर सामान्य भाषेत (lingua vulgar) निरूपण होते. असुंसांव ख्रिस्तपुराणाविषयी बोलत होते व त्यावर बंदी घालण्याचा विचार करावा अशी विनंती ते बिशप फ्रियर मॅन्युएल ह्यांना करत होते कारण बिशप मॅन्युएल हे रियाल मेजा सेंसॉरिया म्हणजेच रॉयल सेन्सॉरशिप बोर्डाचे अध्यक्ष होते. ख्रिस्तपुराण १६१६ साली लिहिले गेले व १७७६ पर्यंत, म्हणजे सुमारे १६० वर्षे तरी, त्याचे वाचन गोव्यातल्या चर्चमध्ये मराठीत नियमित होत होते असा लेखी पुरावा पिसुर्लेकर देतात.
पिसुर्लेकर हेही लिहितात कि ख्रिस्तपुराणातली मराठी भाषा समजण्यास कालांतराने ख्रिस्ती समाजास अवघड होऊ लागली म्हणून ह्या सार्वजनिक वाचनादरम्यान त्यावरचे स्पष्टीकरण चर्चमधल्या श्रोत्यांना कोंकणीत दिले जात होते. आता ह्यावर अग्नी सर म्हणतील बघा, ख्रिस्ती लोकांनी मराठी स्वीकारली नाही आणि मराठीत लिहिलेले ख्रिस्तपुराण त्यांना कोंकणीत समजावे लागत असे! पण हे लक्षात घेणे महत्वाचे आहे कि ख्रिस्तपुराणाचे लेखन व त्याच्या सार्वजनिक वाचनावर बंदी येईपर्यंत १६० वर्षांचा काळ लोटलेला आहे. सर्वसाधारणपणे कुठलीही भाषा इतक्या काळात बदलतेच. शंभर दीडशे वर्षांपूर्वीची कुठलीही भाषा आज वाचताना ती संपूर्णरीत्या कळते असे नाहीच. त्यात गोव्यातल्या ख्रिस्ती समाजाने पोर्तुगीज भाषेचा जास्तीत जास्त वापर करावा ह्यासाठी पोर्तुगीज सरकारचे हरतऱ्हेचे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे अठरावे शतक येईपर्यंत गोव्यातील ख्रिस्ती समाजाचे मराठीशी अंतर निर्माण होणे साहजिक आहे.
पण ह्याचा अर्थ ख्रिस्ती समाजाने मराठी सोडून दिली होती असा होतो का? गोव्यातल्या अभिलेखागारात १८७५ सालचा, म्हणजे ख्रिस्तपुराणावर बंदी आणून सुमारे शंभर वर्षानंतरचा, एक दस्तऐवज माझ्या वाचनात आला. त्यात त्यावर्षी घेतलेल्या मराठी भाषेच्या परीक्षेसंबंधीची कागदपत्रं आहेत. सदर परीक्षेचे स्वरूप म्हणजे एका दिलेल्या मराठी उताऱ्याचा पोर्तुगीज अनुवाद व त्याचे मोडी लिप्यंतर करायचे व दुसऱ्या भागात दिलेल्या पोर्तुगीज उताऱ्याचे मराठी रूपांतर करायचे असे होते. ह्या परीक्षेला चार उमेदवार बसले होते आणि चारही जणांच्या उत्तरपत्रिका त्या दस्तऐवजात जोडलेल्या आहेत. त्या चारपैकी तीन उमेदवार हे कॅथलिक होते. ह्या उदाहरणाने काय सूचित होते ते ज्याने त्याने ठरवावे पण गोव्यातल्या ख्रिस्ती समाजाचे आणि मराठीचे कधीच काही नाते नव्हते किंवा इथल्या ख्रिस्ती समाजाने धर्मांतरानंतर कधीच मराठी वापरली नाही हे एक बेजबाबदार आणि अनैतिहासिक विधान आहे.