जर्मनी

खरं सांगायचं तर मला प्रवास करणं खूपच किचकटीचं काम वाटतं. पण ह्या न त्या कारणाने गेल्या काही वर्षात भारतात आणि भारताबाहेर मी बऱ्यापैकी फिरलो आहे. आता घरात बसायची सक्तीच झाल्यामुळे #throwback च्या नावाखाली प्रवासातले काही जुने फोटो मी इंस्टाग्रामवर अपलोड करत होतो. त्या जोडीला त्या प्रवासातल्या काही आठवणी ताज्या आहेत तर लिहून काढाव्या हा विचार मनात आला. खरंतर माझ्या प्रवासावर काहीतरी लिहावं असं मला सारखं वाटत असतं पण आळसावर मात करून ते साध्य करणं जमत नाही. ह्याही वेळेस जमेल का नाही माहित नाही पण नियमित काहीतरी लिहावं म्हणून हा प्रयत्न करतोय.

हा पहिला फोटो जर्मनीतला. अगदी पहिल्या परदेशवारीचा. राष्ट्राच्या सीमा काय असतात, त्या कशासाठी असतात, वर्णभेद काय असतो, कुठल्यातरी एम्बसीत बसलेल्या कुणा ऑफिसरच्या हातात तुमची स्वप्नं, महत्वाकांक्षा असणं म्हणजे काय वगैरे सगळे त्रास एकत्र अनुभवायचे असतील तर युरोपला जाणे करावे. एक अमेरिकावारी सोडल्यास इमिग्रेशन आणि वीजाचे किस्से हमखास माझ्याबाबतीत झालेत. प्रसंग आल्यास तेही लिहीन इथे कधीतरी. तूर्तास जर्मनीकडे वळू. पहिल्यांदा जर्मनीत गेलो तेव्हा कोलोन शहरात मुक्काम होता. दुसऱ्यांदा गेलो तेव्हा कोलोनबरोबर बर्लिन आणि म्युनिक हि दोन शहरे बघितली. बर्लिनविषयी वेगळं लिहीन इतकं ते शहर मला आवडलं.

म्युनिक मध्ये असताना डाकाव कॅम्प पाहायला गेलो होतो. १९३३ साली सुरु झालेला हा कॅम्प बहुधा पहिला कॅम्प असावा. तिथल्या एका दालनात नाझी पार्टीचा उदय कसा झाला ह्यावर एक प्रदर्शन आहे. आपल्याकडची परिस्थिती समजून घ्यायची असेल तर हा इतिहास जरूर वाचावा. ज्या बीयर हॉल मध्ये नाझी पार्टीची पहिली बैठक झाली तोही हॉल पहिला.

जर्मनीत फिरताना दुसऱ्या महायुद्धाच्या आधी आणि नंतर जे काही घडलं त्याची आठवण करून देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. कोलोनमधल्या फूटपाथवर सपाटीवरून थोड्याश्या बाहेर येणाऱ्या ब्रास प्लेट्स बसवल्या आहेत. त्याला स्टॉलपरस्टाईन म्हणतात. ह्या प्लेट्सवर नाझी संहारात मारल्या गेलेल्या ज्यू लोकांची नावं आहेत. ह्या प्लेट्स त्या लोकांच्या शेवटच्या माहीत असलेल्या जागांवर लावलेल्या आहेत. त्या एकतर तुम्हाला चालताना दिसतील किंवा त्यावरून चालत गेलात तर काहीसे अडखळाल. ह्या न त्या प्रकारे तुमचं लक्ष वेधून घेऊन नाझी पार्टीने ज्यू लोकांविरुद्ध केलेल्या अत्याचारांची आठवण ह्या प्लेट्स करून देतात.

 

हा फोटो रुडसाईम ह्या ऱ्हाईन नदीच्या काठी वसलेल्या गावातला आहे. जर्मन राजवटीच्या स्थापनेच्या स्मरणार्थ एकोणिसाव्या शतकात हे स्मारक बांधलं होतं. तिथल्याच मागील एका विनयार्डात ‘राष्ट्रवाद हा पर्याय नाही’ अश्या आशयाचा एक संदेश मोठ्या अक्षरात लिहिला होता.

kaustubh
Reads old newspapers and researches on Goan History.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *