व्यासपीठावरील मान्यवरांना, तसेच इथे जमलेल्या तमाम भीमसैनिकांनी माझा क्रांतिकारी जय भीम!
ज्या माणसाच्या विचाराने, श्रमाने आणि लेखणीच्या फटकाऱ्याने आमच्या सारख्या लोकांच्या आयुष्यातला अंधार नष्ट झाला त्या क्रांतिसूर्य डॉ भीमराव आंबेडकरांना अभिवादन तसेच ह्या देशातील विषमतावादी व्यवस्थेला पहिला सुरुंग लावणाऱ्या महात्मा जोतीराव फुलेंनाही माझं वंदन! इंग्रजीत एक म्हण आहे – we are because he was! ते होते म्हणून आज आम्ही आहोत.
आम्हा सगळ्यांचं भाग्य म्हणजे ह्या कार्यक्रमात डॉ भारत पाटणकर मुख्य अतिथी आहेत. ह्यांच्या कार्याने, लेखणीने बहुजनांच्या अनेक पिढ्या केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरात घडल्या. त्यांच्या सहवासात ही भीमजयंती साजरी व्हावी हे आम्हा सर्वांसाठीच अभिमानास्पद आहे. खरं सांगायचं झालं तर आज मला काहीसं दडपणही आलेलं आहे. जेव्हा मिलिंद माटे सरांनी मला फोन करून जोतीराव फुलेंच्या विचारांच्या अंगाने बोलण्याचा सल्ला दिला तेव्हा पहिला संदर्भ मी पहिला तो गेल ओम्वेद ह्यांचा महात्मा फुलेंवरचा लेख. त्या एक महान विदुषी होत्या आणि पाटणकर सरांच्या सहचारिणी होत्या. जगभरात आज जात ह्या विषयावर जे संशोधन होत आहे त्याला प्रभावित करणाऱ्या विचारवंतांत डॉ ऑम्वेद ह्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जात. आज त्यांची आठवण येणं माझ्यासारख्या विद्यार्थ्याला साहजिकच आहे.
मित्रहो, इथे येण्यापूर्वी मी काय बोलू ह्यावर बराच विचार केला. महात्मा फुले, डॉ आंबेडकर ह्यांच्याविषयी बोलणे क्रमप्राप्त आहे पण त्याहीपेक्षा त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन गोव्याच्या जातवास्तवासंबंधी बोलणं अधिक उचित ठरेल असं मला वाटलं आणि त्याप्रमाणे मी काही गोष्टी लिहून आणल्या आहेत. एकतर गोव्यात असलेलं जातवास्तव, व त्याविरोधात सातत्याने झुंजणारे लोक, युगनायक सारख्या संस्था ह्यांच्याविषयी फारसं बोललं जात नाही. आणि दुसरं म्हणजे हल्ली कोण काय बोललं तर कोणाच्या भावना दुखावल्या जातील ह्याचा नेम नाही. मजा अशी झाली आहे कि फुले आंबेडकर सगळ्यांना हवे आहेत पण ते केवळ एका समाजाचे प्रतीक म्हणून. भारतीय समाजाचा – ज्यात जातव्यवस्था हि केंद्रस्थानी आहे – त्या सामाजिक रचनेची व्यापक चिकित्सा करून ते बदलण्यासाठी प्रयत्न करणारे विचारवंत म्हणून फुले व आंबेडकर इथल्या लोकांना, इथल्या राजकीय व्यवस्थेला नको आहेत. पण भावना दुखतील म्हणून सत्य बोलायला घाबरायचं का? फुलेंनी आपल्याला सत्यशोधक परंपरा दिली आणि आंबेडकरांनी आपल्याला संविधान नावाचं एक शस्त्र दिलं. आज त्याच परंपरेला जागून मी काही विचार इथे मांडणार आहे.
माझ्या भाषणाचे तीन टप्पे आहेत. इतिहास, वर्तमान आणि भविष्य. एक समाज म्हणून आणि खासकरून बहुजन समाज, जो अनेक शोषित, वंचित समूहांनी मिळून बनलेला आहे, अश्या समाजाने खरोखरच ह्या तीन गोष्टींवर सारासार विचार करणं गरजेचं आहे. इतिहास, वर्तमान आणि भविष्य!
तर आधी इतिहासाकडे येऊ – गोव्याच्या इतिहासापासूनच सुरु करू! गोव्याच्या इतिहासात बहुजन समाज कुठे आहे? मी स्वतः इतिहासाचा विद्यार्थी आहे. बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेतील न्यू यॉर्क मधल्या कोलंबिया विद्यापीठात पीएचडी शिकले. त्याच कोलंबिया विद्यापीठपासून दीड तास दूर अजून एक मोठं आणि जुनं विद्यापीठ आहे पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ. त्या विद्यापीठात मी गोव्याच्या इतिहासावर पीएचडी करतोय. गोव्याच्या इतिहाससंबंधात जितकी पुस्तकं लिहिली आहेत त्यातली बहुतेक मी वाचली आहेत. केवळ इंग्रजीत नव्हे तर मराठीत आणि पोर्तुगीज मधली पण पुस्तकं मी वाचली आहेत. क्वचितच त्यात गोव्यातल्या बहुजन समाजाविषयीच्या इतिहास आपल्याला मिळतो. आता ह्याचा अर्थ आपल्या लोकांना इतिहास नाही असा घ्यायचा का? आपण एक समाज म्हणून ह्यावर कधी विचार केला आहे का? हे का घडतं? तर पूर्वीपासून इथे इतिहास लिहिणारे हे एकाच वर्गातून, सामाजिक पृष्ठभूमीतून यायचे. ते उच्चभ्रू होते. त्यांच्या शेतजमिनी होत्या, भाटं होती. त्या भाटात तुमचे आमचे पूर्वज राबायचे त्याबदल्यात त्यांना पैसे मिळाले तर मिळाले नाहीतर तेही मिळायचे नाही. ह्या वर्गाकडे मोकळा वेळ होता. त्या मोकळ्या वेळात हे साहित्य लिहायचे, इतिहास लिहायचे, गाणी म्हणायचे. पण ह्यांनी लिहिलेल्या इतिहासात, साहित्यात आमचे लोक कधी दिसले नाही. आपण एक अदृश्य समाज होतो. मागल्या दाराने यायचं, काम करून निघून जायचं. ज्या वर्गाने आमच्या पूर्वजांचे असे शोषण केले तो वर्ग आपला इतिहास लिहिणार आहे का?
गोव्यात पोर्तुगीज सोळाव्या शतकापासून होते. इथल्या उच्च्वर्णीय समाजाच्या फायद्याचे कायदे त्यांनी बऱ्याच आधीपासून करून ठेवलेत. कोमुनिदाद कायदा, महाजन कायदा, जमिनीच्या मालकीचा कायदा हे सोळाव्या, अठराव्या, एकोणिसाव्या शतकात तयार झाले. गोव्यात बहुजनांच्या बाबतीत पहिला कायदा कधी झाला माहित आहे? १९०१ साली. विसाव्या शतकात. मुंडकरांना अचानकपणे बेघर करण्याच्या विरोधात एक कायदा १९०१ साली पास करण्यात आला. आणि त्याच्याही विरोधात भाटकार परत कोर्टात गेले आणि त्याच्यात बदल करून आणले. त्या बदललेल्या कायद्यात अशी तरतूद होती कि मुंडकाराने जर भाटकाराला मान दिला नाही तर त्याला जमिनीवरून काढण्याचा पूर्ण अधिकार भाटकाराला होता. तो जाऊन मुंडकरांना जमिनीचे हक्क मिळेपर्यंत भाऊसाहेब बांदोडकरांना कूळ मुंडकार कायदा आणावा लागला. आजही मुंडकारी खटले सुटलेले नाहीत. इथे बरेचसे लोक पेडण्याहून आलेत. ह्याबद्दल तुम्हाला मी वेगळं सांगण्याची गरज नाही. आज ज्या कोमुनिदादींचे गोडवे जगभरात गायले जातात, किंवा गोव्याच्या निसर्गाबद्दल, इथल्या खाजन शेतीव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून लोक गोव्यात येतात, त्या शेतात राबणारी, मानशी राखणारी लोकं कोण होती? ह्यांचा इतिहास कुठे आहे? तो लिहिला जात नाही कारण तो इथल्या व्यवस्थेच्या सोयीचा इतिहास नाही.
ताजे उदाहरण बघा – महात्मा फुल्यांवर चित्रपट येतोय तर त्याला विरोध करायला काही संघटना पुढे सरसावल्या आहेत. त्यांची सामाजिक पार्श्वभूमी काय हे मी वेगळं सांगायची गरज नाही. पण एक चांगली गोष्ट म्हणजे ह्या विरोध करणाऱ्यांपेक्षा ह्या चित्रपटाचे समर्थन करणारे लोक जास्त आहेत? कारण फुले दाम्पत्याच्या कार्याचा इतिहास आज जगभरात पोचला आहे. परदेशी विद्यापीठातून तो शिकवला जातो. म्हणून म्हणतो, आपला इतिहास जोपर्यंत लिहिला जाणार नाही तोपर्यंत आपलं ह्या समाजात नेमकं स्थान काय हे आपल्याला कळणार नाही. बाबासाहेबांनी भीमा कोरेगावचे स्मारक शोधून काढून नेमकं हेच केलं. ह्या समाजाला अस्पृश्य गणलं गेलं त्याला त्याच्या शक्तीची जाणीव करून दिली. ते सामर्थ्य इतिहासामध्ये आहे. आपला इतिहास हा आपणच लिहावा लागेल.
त्यासाठी काय करावं? आपल्या मुलांना डॉक्टर इंजिनियर बनवा पण चार पाच जणांना इतिहासकारही बनवा. इथे शिका किंवा बाहेर जाऊन शिका. कारण इथे तुम्ही प्रस्थापित इतिहासाविरोधात काही लिहायला गेला तर तुम्हाला मागे ओढणारे लोक खूप असतील. बऱ्याच वेळा तुमचे प्राध्यापकच असतील. गोव्याबाहेर जाऊन शिका पण ह्या कामात मागे पडू नका. नाहीतर व्हाट्सएप्पवर इतिहास वाचून आपण कधी एकमेकांचा द्वेष करायला लागू हे सांगता येत नाही.
हि झाली इतिहासाची गोष्ट. आता वर्तमानाकडे येऊ. वर्तमानात काय करणे गरजेचे आहे तर महत्वाच्या संस्थांवर आपली माणसं बसवणे. लोकशाही हि संस्थांमार्फत चालते. आणि त्या केवळ सरकारी संस्था नसतात. जसं प्रशासन, न्यायपालिका ह्या सरकारी संस्था आहेत, तशीच विद्यापीठं, शिक्षण संस्था, सहकारी बँका ह्या सारख्या बिगर सरकारी संस्था आहेत. प्रसार माध्यमं आहेत. आज गोव्यात किती संपादक बहुजन समाजातले आहेत? माध्यमं जर मत घडविण्याचे काम करतात तर त्या प्रक्रियेत बहुजनांचा वाट आहे का नाही? बहुजनांची बाजून घेऊन भांडणारं एक तरी वर्तमानपत्र गोव्यात आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ह्या सर्व संस्थांमध्ये भागीदारी हवी कारण आपल्याला संविधानिक मूल्ये त्यातून राबविता आली पाहिजे. हे करणं फारसं कठीण नाही पण ज्या वेगाने ते व्हायला पाहिजे ते होत नाही. ते कठीण नाही कारण आरक्षण नावाचं शास्त्र आपल्याकडे आहे. खरंतर आरक्षणाविषयी मी बोलणार नव्हतो कारण बहुजन राजकारणाला आजपर्यंत केवळ आरक्षण ह्या एकाच गोष्टीकडे मर्यादित करून ठेवलंय. पण एक गोष्ट माझ्या सातत्याने लक्षात आली ती अशी कि आजही आपल्या मुलांमध्ये, जे आरक्षणातून शिकायला जातात, त्यांना अपराधीपणाची भावना दिली जाते आणि त्याहीपेक्षा म्हणजे त्यांना भेदभावाची वागणूक दिली जाते. आज ह्या व्यासपीठावरून मी हे सांगू इच्छितो कि आरक्षण घेतल्याचा कसलाच संकोच बाळगू नका. मेरीट हे एक थोतांड आहे. त्याच्यापेक्षा मोठी लबाडी भारतात झाली नाही. कसलं मेरिट घेऊन बसलेत हे लोक? मेरिट म्हणजे केवळ तुम्हाला घरी किती सुख सोयी उपलब्ध आहे त्याचे मोजमाप आहे. एक उदाहरण घेऊन – मी आणि माझी बायको उच्च्शिक्षित आहे. आम्ही एका बंगल्यात राहतो. माझा मुलगा किंवा मुलगी सगळ्यात महागड्या शाळेत शिकतात. आम्ही त्यांचा अभ्यास घेतो. घरी त्याच्याशी इंग्लिशमध्ये बोलतो. त्याला वेगवेगळी पुस्तकं आणून देतो. त्याला कोचिंग क्लासेसला घातलं आहे. त्याला शाळेत जायला, घरी यायला वेगळी गाडी आहे. ह्या मुलाची स्पर्धा आता पेडण्यातल्या किंवा सांगेतल्या एका विद्यार्थ्यांशी करू. त्या विद्यार्थ्यांची शाळा घरापासून दूर आहे. तिथे जायला धड बस नाही. घरी अभ्यास करायला धड जागा नाही. आई वडील जेमतेम शिकलेलं. ते दिवसभर कामाला जातात तर धाकट्या भावंडालाही सांभाळायचं आहे. घर साफ करायचं आहे. कदाचित जेवणही बनवावं लागत असेल. ह्या सर्व व्यापातून वेळ काढून त्या विद्यार्थ्याला शिकायचं आहे. आता मला सांगा ह्या विद्यार्थ्यांची आणि माझ्या मुलाची स्पर्धा समान पातळीवर आहे का?
आता हाच विचार एका मोठ्या, सामाजिक पातळीवर करा. एका समाजाला शतकानुशतके शिक्षणापासून वंचित ठेवलं तो केवळ गरीब आहे म्हणून नाही तर तो खालच्या जातीचा आहे म्हणून. आणि आता त्याला अचानकपणे मुख्य प्रवाहात आणून सोडलं आणि म्हटलं शिका. तिथे आल्यावर त्यांना मानसिक त्रास द्यायचा, त्यांचं खच्चीकरण करायचं आणि मग म्हणायचं तुम्ही आमची बरोबरी करू शकत नाही, तुम्हाला मेरिट नाही. ह्याला काय अर्थ आहे? कोण काहीही म्हणो. आरक्षण आपला हक्क आहे, ती भीक नाही. तो मिळवा. देशातल्या प्रत्येक संस्थामांध्ये आपलं प्रतिनिधित्व असलं पाहिजे नाहीतर हे लोक आपल्याला डोकं वर काढू देणार नाही. इतक्या वर्षांनंतरही आपण आरक्षणावर बोलतोय हि खरी ह्या समाजाची शोकांतिका आहे. बाबासाहेब म्हणायचे कि भारतात समाज नावाची कल्पना रुजू शकत नाही कारण जातिव्यवस्थेमुळे इथे बंधुत्व निर्माण होऊ शकत नाही, fraternity निर्माण होऊ शकत नाही. बाबासाहेब म्हणायचे इथे समाज नाही तर गँग्स आहेत. गँग्स ह्या केवळ स्वतःचा फायदा बघतात आणि त्यासाठी ते दुसऱ्याला लुटण्यास, प्रसंगी त्यांचा जीव घेण्यास मागेपुढे पाहत नाही.
सर्वात शेवटी आणि तिसरी गोष्ट म्हणजे भविष्य. भविष्यात आपल्याला काय करायचंय तर आपली भागीदारी सत्तेत कायम करायची आहे. ते आपलं ध्येय असलं पाहिजे. आज आपण पाहतो कि बहुजनवादी राजकारणाची परिस्थिती फारशी चांगली नाही. ती परिस्थिती बदलावी लागेल. आणि सत्ता म्हणजे केवळ जास्तीत जास्त बहुजन आमदार निवडून आणणे नाही. तर आपण, आपले प्रश्न, आपला समाज हा सत्तेच्या केंद्रस्थानी असले पाहिजे. लोकांना वाटतं कि जास्त आमदार निवडून आले कि सगळं सोपं होतं. तस असेलही पण तशी सत्ता चिरकालीन टिकत नाही. सत्तेसाठीचा लढा हा आधी सामाजिक क्रांती मग राजकीय सत्ता अश्या क्रमाने येतो. आपल्याला दीर्घकालीन सत्ता स्थापन करायची आहे कारण भारतात जर खरी लोकशाही राबवायची धमक कोणात असेल तर ती फुले आंबेडकरी विचारांनी प्रेरित झालेल्या समाजातच आहे. त्यामुळे आजपासून आपण कमला लागलं पाहिजे. परत एकदा सांगतो इतिहासातून समाजात, वर्तमानातून संस्थांमध्ये, आणि भविष्यात सत्तेमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करणं हि आपली काळाची गरज आहे. त्यासाठी आपल्याला वेगळं कुठेही जायची गरज नाही, फुले आंबेडकरी विचारांची कास धरून आपण संविधानाच्या मदतीने चालू लागलो तर विजय आपलाच आहे.
शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा ह्या बाबासाहेबांच्या संदेशाची आठवण करून आपली रजा घेतो. पुन्हा एकदा सर्वांना कांतिकारी जय भीम!