लिस्बन -१

फोटोमध्ये किंवा युट्युबवर जसं दिसतं तसंच लिस्बन आहे. नजरेत भरणाऱ्या रंगीत इमारती, खिडक्यांतून बाहेर डोकावणारी म्हातारी माणसं, अरुंद चढ्या रस्त्यावरुन येजा करणारी पिवळी ट्राम, आणि प्रवाश्यांनी गजबजलेलं शहर. रस्त्यावरून येताजाता ‘बॉ दिया’ आणि ‘बॉ नॉयत’ म्हणणारे, मी गोव्याचा आहे हे समजल्यावर अधिक आपुलकीने विचारपूस करणारे अनोळखी लोक. युरोपमध्ये फिरताना कमालीचं एलियनेशन जाणवतं. आपण इथले नाही हि जाणीव सतत होत असते (आणि करूनही दिली जाते). पण लिस्बनमध्ये असं कधी वाटलं नाही. मी गोव्याचा असल्यामुळे असलेला पूर्वग्रह म्हणा का काहीही, पण युरोपमध्ये इतरत्र फिरताना कुठेही न जाणवलेली आपुलकी लिस्बनमध्ये जाणवली. हक्कानं आपलं म्हणावं असं शहर.

२०१७ मध्ये जेव्हा मी लिस्बनमध्ये गेलो तेव्हा अजिबातच प्रवास करायची मनस्थिती नव्हती. बाबा जाऊन दोनच महिने झाले होते. मी खूपच डिसओरिएंटेड होतो. त्यात जायची तयारी एकदम दोन आठवड्यात करायची होती. सगळ्या गोष्टी पथ्यावर पडल्या व शेवटी लिस्बनमध्ये पोचलो. प्रथमदर्शनी कोणाच्या प्रेमात पडावं तसं त्या शहराच्या प्रेमात पडलो. ते प्रेम आजही कायम आहे.

हा फोटो हा लिस्बनचे पेट्रन सेंट, सांव व्हिन्सेंट दे फोरा, ह्यांच्या पुतळ्याचा आहे.

लिस्बनला जाऊन झालेलं दुसरं प्रेम म्हणजे फर्नांडो पेसोआ. कॅफे ब्राजिलैराच्या बाहेर पेसोआचा एक पुतळा आहे. पेसोआ हा एक मॉडर्न पोर्तुगीज कवी आहे एवढं माहित होतं पण त्याचं साहित्य मी लिस्बनमध्ये असताना वाचलं आणि पुरता झपाटून गेलो. “To express something is to conserve its virtue and take away its terror” हे लिहिणारा पेसोआ मला लिस्बनमध्ये भेटला. त्याचं ‘बुक ऑफ डिस्कवायट’ हे पुस्तक मी नेहमी सोबत बाळगतो. कमालीचा एकटेपणा आणि दुःख अनुभवलेल्या ह्या अवलिया लेखकाने सुमारे पंच्याहत्तर टोपणनावांनी (heteronyms) लेखन केलं. प्रत्येक टोपणनावाचं स्वतंत्र चरित्र, त्याची स्वतंत्र राजकीय भूमिका, स्वतंत्र लेखन शैली पेसोआने विकसित केली. रिकार्डो रैस, बर्नाडो सुआरिस, अल्व्हारो काम्पूश हि त्याची गाजलेली heteronyms आहेत.

 

बेलेमध्ये गेलो असता तिथली जेरोमी मॉनेस्ट्री, बेलें टॉवर, कामोईशची समाधी पाहत मी पाद्रांव दूश देशकोम्ब्रीमेंतूश (the monument of discovery) पाशी आलो. युरोपहून भारतासाठी निघालेलं वास्को द गमाचं जहाज हे ह्याच बंदराहून निघालं होतं. आफ्रिका खंडाला वळसा घालून भारतापर्यंत पोचण्याचा समुद्रमार्ग शोधण्याच्या तसेच पोर्तुगालहून झालेल्या इतर डिस्कव्हरी अंकित करण्यासाठी १९३९ साली हे स्मारक बनवलं होतं. ह्या स्मारकाच्या तळाशी वर्णभेद आणि नागरिकतेवर एक प्रदर्शन भरवलं आहे. आफ्रिकन लोकांच्या गुलामगिरीवर पोसलेला युरोपियन वसाहतवाद हा ह्या बंदरापासून सुरु झाला. त्याच बंदरावर त्या गुलामगिरीमुळे झालेली आणि आजही अव्याहत सुरु असलेली आफ्रिकन लोकांच्या वर्णभेदाचा अनुभव सांगणारी कहाणी सांगणारं हे प्रदर्शन आहे.

युरोपियन वसाहतवादाचं चक्र सुरु करून देणारं लिस्बन शहर आज स्वतःच जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत ढासळत चाललेल्या अर्थव्यवस्थेच्या अंतर्विरोधाचं ओझं घेत उभं आहे. पोर्तुगालने आजपर्यंत अनेक राजकीय स्थित्यंतरं बघितली आहेत. आताही पोर्तुगाल एका भीषण आर्थिक धक्क्यातून वाट काढत आहे. ह्या प्रक्रियेत लिस्बनमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. परदेशी चलन अर्थव्यवस्थेत यावं आणि अर्थव्यवस्था खेळती राहावी म्हणून तिथलं सरकार आता पर्यटन आणि रियल इस्टेटमधील गुंतवणुकीवर भर देत आहे. रियल इस्टेटमधील परदेशी गुंतवणुकीच्या बदल्यात पोर्तुगीज नागरिकत्व बहाल करण्यात येत आहे. ह्याची दुसरी बाजू म्हणजे तिथे पूर्वीपासून राहणाऱ्या अनेक लोकांवर त्यांची घरं खाली करण्याची पाळी आली आहे.

पण हे सर्व बदल होताना युरोपमध्ये इतरत्र दिसणारा फॅसीजम पोर्तुगालात (सद्यातरी) दिसत नाही. ह्याचं एक कारण म्हणजे सालाझारच्या राजवटीचे दुष्परिणाम बघितलेली पिढी आजही पोर्तुगालमध्ये आहे आणि परिस्थिती कितीही बिकट झाली तरी एकाधिकारशाही हा काही पर्याय असू शकत नाही हे त्यांना मनोमन वाटतं असं तिथल्या एका इतिहासकाराचं म्हणणं आहे.

kaustubh
Reads old newspapers and researches on Goan History.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *