गेल्या आठवड्यात फोंडा येथील पंडितवाड्यावरून जाताना रस्त्याच्या दुतर्फा बरीच लगबग दिसली आणि अचानक आठवलं हजरत पीर अब्दुल्लाचा उरुस आहे. डॉक्टरेटच्या संशोधनाच्या निमित्ताने फोंड्याच्या आणि एकूणच गोव्याच्या इस्लामिक इतिहासाविषयी बरीच माहिती वाचनात आली. ह्या माहितीमुळे अनेक वर्षांपासून फोंड्यात प्रचलित असलेल्या ह्या उरुसाकडे नव्या दृष्टीने पाहायची संधी मिळाली. डॉ पांडुरंग पिसुर्लेकर ह्यांचे पोर्तुगीज मराठे संबंध हे पुस्तक वाचताना कोटातल्या ह्या दर्ग्याविषयी एक पत्र वाचनात आलं. संदर्भ आहे १६८३ साली पोर्तुगीज आणि मराठ्यांच्यात झालेल्या तुंबळ युद्धाचा.
१६८३ च्या पावसाळ्यात छत्रपती संभाजी महाराजांनी चेउलच्या किल्ल्यास घोडदळ व पायदळ सोबतीस घेऊन वेढा घातला. तो वेढा सुटावा व महाराजांचे लक्ष विचलित व्हावे म्हणून विजरै कोन्द दे आल्व्होराने फोंड्यावर चाल करायचे ठरवले. सुमारे ३७०० सैन्यबळ घेऊन आल्व्होराने आगशी येथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी ते दुर्भाटच्या बंदरावर पोचले. आल्वोराला फोंड्याचा तत्कालीन देसाई दुलबा नायक फितूर झाला होता आणि दुर्भाटला तोही त्यांच्याबरोबर होता. फोंडा महाल तेव्हा मराठ्यांच्या अधिपत्याखाली होता.
३०० मराठे सैनिकांबरोबर लढून आल्वोराचे सैन्य फोंड्यात पोचले. पुढचे दोन दिवस पोर्तुगीजांनी फोंड्यातल्या किल्ल्यावर (कोट) गोळ्यांचा मारा सुरु ठेवून आतली तटबंदी मोडण्यात यश मिळवले. पोर्तुगीज शेवटचा प्रहार करण्याच्या तयारीत असतानाच राजापूरहून दस्तुरखुद्द संभाजी महाराजच ६०० घोडदळाची कुमक घेऊन फोंड्यास दाखल झाले. महाराज इथे पोचल्याने माघार घेताना आपण अडवले जाऊ ह्या भीतीने पोर्तुगीज परत दुर्भाटच्या दिशेने जाऊ लागले. ते परतताना येसाजी कंक ह्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी अचानक पोर्तुगीजांवर हल्ला चढवून त्यांना पांगवण्यात यश मिळवले. मुख्य म्हणजे खुद्द आल्वोर ह्यात गंभीर जखमी होऊन मरता मरता वाचला. उरलेले सैन्य पोर्तुगीज गोव्यात परतले.
हि लढाई जुलै १६८३ ते जानेवारी १६८४ पर्यंत चालूच राहिली. पोर्तुगीजांच्या तोफेच्या माऱ्यामुळे कोटाचे बरेच नुकसान झाले होते व ह्याच पडझडीतून महाराजांनी पुढे जाऊन मर्दनगडचा किल्ला बांधला. त्याखेरीस ४ जानेवारी १६८४ साली महाराजांचे निकट कवी कलश ह्यांनी फोंड्याच्या किल्ल्याचे हवालदार धर्माजी नागनाथ ह्यांच्याकडे मराठीत लिहिलेले एक पत्र दिले. त्याचा मजकूर पुढीलप्रमाणे:
हजरत पीर अब्दुल्ला खान कोट फोंडा बहुत जागृत स्थळ फिरंगियानी गनिमाची करून कोटास वेढा घातला. कोट बहुत जेर केला. तेव्हा कोट मजकुराच्या हवालदार, सरनौबत, सबनीस, नाईकवाडी लोकांनी प्रार्थना केली की गनिमाचा पराभव करणे. राजश्री छत्रपती स्वामी विनंती करून मुर्जाचले सारखी पोख्ती सरंजाम करून घेऊन राजश्री स्वामींचे फत्तेबाजी होऊ देणे म्हणून नियत केला. त्यावरी राजश्री स्वामींचे कोट मजकूर आगमन होऊन फिरंगी गनीम मारुन काहडले. राजश्री स्वामींची जये झाली. फत्ते जाहली. ऐशी पीराची करामत म्हणोन तुम्ही व कोतकर याही स्वामींस विनंती केली त्यावरून नियत केला, धर्मादाय देविला. दरसाल नव होन ५० उदफूल, दिवा देखील उरूस ऐकून नवहोन २६ मुजावर नफर सालीना होन २४ येणे प्रमाणे सुभे मजकूर ऐवज देविला.
महाराजांनी हजरत पीर अब्दुल्लाच्या दर्ग्याला जागृत दैवी स्थान मानून पोर्तुगीजांवर मराठ्यांनी मिळवलेला विजय हा पीर अब्दुल्लाची करामत असे मानले व तिथल्या मुजावर कुटुंबास उरूस, दिव्याच्या तेलाचा वगैरे सालाना खर्च जारी केला. ह्या ऐतिहासिक घटनेतून बरेच काही शिकण्यासारखे आहे. आज इतिहासाकडे पाहताना आपण धर्मांध चष्म्यातून पाहतो आणि अश्या इतिहासाचा वापर हा समाजात तेढ वाढविण्यासाठी होत आहे.
गोवा आणि पर्यायाने फोंडाही त्याला अपवाद नाही. त्याहीपेक्षा शोकाची गोष्ट म्हणजे हि हिंदू मुस्लिम तेढ वाढविण्यासाठी महाराजांच्या प्रतिमेचा वापर सर्रास होताना दिसतो पण ह्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येते महाराज स्वतः जातीधर्माच्या पलीकडे विचार करू शकणारे शासक होते. याउलट ह्या पूर्ण मराठा पोर्तुगीज लढ्याच्या दरम्यान दुलबा देसाई, केशव प्रभू, डिचोलीचे देसाई, कुडाळचे खेम सावंत वगैरे घराणी हि मराठ्यांच्या विरुद्ध व पोर्तुगीजांच्या बाजून लढत होती. तात्पर्य हेच कि इतिहास हा कधीच सोपा व सरळसोट नसतो व त्याउलट तो अनेक विरोधाभासांनी भरलेला असतो.